Jalna News: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित मंत्री कामाला लागले आहे. दरम्यान कृषीमंत्री पदाची जवाबदारी मिळताच अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपल्या कामाला सुरवात केली आहे. कृषीमंत्री पदाची घोषणा होताच त्यांनी दुसऱ्याच दिवशी जालना येथे मराठवाडा विभागाची बैठक बोलावून आढावा घेतला. त्यांनतर आता आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचं सत्तार म्हणाले आहे. 


अब्दुल सत्तार यांनी सोमवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची विभागीय बैठक घेतली. बैठकीत कृषी विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस सर्व अधिकाऱ्यांसह शेताच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेवून याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. 


काय म्हणाले सत्तार? 


यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी आणि माझ्या खात्याचे अधिकारी दर आठवड्यात एका गावात जाणार आहोत. त्या गावात गेल्यावर शेतकऱ्यासोबत एक दिवस घालून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या समस्या कळणार नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याच अब्दुल सत्तार म्हणाले आहे. 


शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणार...


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येची संख्या अधिक असल्याने आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्यावर ही वेळ का येत आहेत याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याच सत्तार म्हणाले. सोबतच जमिनी कशा आहेत, त्यातून शेतकरी काय पिकवत आहे. त्याने काय पिकवले पाहिजे या सर्व गोष्टी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन यावर काही निर्णय घेता येतील का याचा विचार केला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले. 


पटोलेंना उत्तर...


मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात शिंदे गटाकडे डोंगर आणि झाडीच आली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. याच टीकेला उत्तर देतांना सत्तार म्हणाले की, आता आम्हाला झाडी दिली, डोंगर दिली की शेती दिली किंवा उद्योग दिला हे सर्व काम आम्ही शिवसेना-भाजप युतीत योग्यप्रकारे करूत. विरोधीपक्षाला त्यांच्या डोळ्याला जसा चष्मा लागलेला आहे त्याप्रमाणे ते पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 तास काम करतात त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करायला पाहिजे. त्यामुळे विरोधाला विरोध करू नयेत असा टोला सत्तार यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.