Jalna Crime News: जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जालना शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ताब्यातून तब्बल 9 तलवारी जप्त केल्या आहेत. एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या लोखंडी संदुकामध्ये या तलवारी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी शेख कलीम शेख शरीफ नावाच्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने या तलवारी खरेदी केल्याची कबुली दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपींची माहीती घेऊन त्यांचा शोध घेणेबाबत विशेष मोहीम राबविण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळी पथके तयार करुन जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपींची माहीती घेऊन शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, शेख कलीम शेख शरीफ ( रा. वाल्मीक नगर जालना)  याने एका ठिकाणी तलवारी लपवून ठेवल्या आहेत. 


तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...


माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचासह वाल्मीकनगर जालना येथे जावुन कलीमच्या घराजवळ असलेल्या पत्राच्या शेडची झडती घेतली. यावेळी एका लोखंडी पेटीमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या धारदार नऊ तलवारी म्यानसह मिळुन आल्या. पोलिसांनी कलीमला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने या तलवारी त्याचा मित्र आफरोज हफीज पठाण ( रा. मंगळबाजार जालना ) याचे मार्फतीने एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जालना तलवार कनेक्शन....


जालना शहर आणि तलवार हे एक कनेक्शन बनले आहे. कारण यापूर्वी सुद्धा जालना शहरात अनेकदा तलवारी पकडण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात धुळे पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरून एक खंजीरसह 89 तलवारी जप्त केल्या होत्या. विशेष म्हणजे ही शस्त्रे राजस्थानच्या चित्तोडगड या ठिकाणाहून जालना शहरात आणले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. तर याप्रकरणी जालना शहरातील चंदणझिरा परिसरात राहणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अवैध शस्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.  त्यात आता पुन्हा तलवारी सापडल्याने जालना शहरात खळबळ उडाली आहे.