जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणामुळे आता त्यांच्या परिवाराची चिंता वाढलीये. 'आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तात्काळ निकाली काढावा अन्यथा आपल्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील' असा इशारा मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्याने काहीतरी मार्ग निघेल अशी आशा मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर एकतर आता माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
पण या सगळ्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला मात्र मोठ्या दिव्याला समोरे जावे लागत असल्याचं चित्र आहे. पण तरीही जरांगे यांनी त्यांच्या आमरण उपोषणाची भूमिका ठाम ठेवलीये. सध्याच्या या अवस्थेला सरकारच जबाबदार असल्याचं जरांगे यांच्या कुटुंबाचं म्हणणं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडला. याआधी जरांगे यांनी केलेलं उपोषण स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाऊन सोडवलं. पण आता या उपोषणावर सरकार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माझ्या मुलाचा त्रास वाढतोय - रावसाहेब जरांगे (मनोज जरांगे यांचे वडिल)
मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना माझ्या मुलाचा त्रास वाढतोय अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आरक्षण देतील ही वेळ यायला नको होती. यामुळे माझ्या मुलाचा जास्त त्रास वाढतोय. पण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आम्हाला कुठेतरी आशा वाटतेय.' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्या मेळाव्यात, शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली.
माझ्या नवऱ्याला काही झालं तर सरकारच जबाबदार - सौमित्रा जरांगे (जरांगे यांची पत्नी)
माझ्या नवऱ्याला काही झालं तर त्याला हे सरकारच जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया देत मनोज जरांगे यांच्या पत्नीने सरकारला इशारा दिला. 'मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली त्याचा मान राखून तरी आता आरक्षण द्यायला हवं. सरकारने ही वेळ आणायला नको होती. पण समाजासाठी मी संसारातील अडचणींचा सामना करण्यात तयार आहोत, असं मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी म्हटलं. '
दरम्यान मराठा तरुणांनी आत्महत्या न करण्याचं आवाहन मनोज जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे यांनी केलंय. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, कोणाही आत्महत्या करु नका. आत्महत्या केली तर मिळणाऱ्या आरक्षणाचा काय उपोयग.
मनोज जरांगे यांची उपोषणाची भूमिका जरी ठाम असली तर यावर आता सरकार कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. तसेच आता तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.