Ajit Pawar Shinde-Fadnavis Government : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. विधानपरिषद आणि कसब्यातील पराभवानंतर शिंदे फडणवीस धास्तावले असून, त्यामुळेच हजारो कोटी रुपयांचा खर्च करून सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. तर या सरकारचा एकच धंदा सुरु असून, सगळीकडे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान लावण्यात येत आहे. तर कशाचा वेगवान बोडक्याचा...असा खोचक टोला अजित पवारांनी सरकारला लगावला आहे. अजित पवार आज जालना दौऱ्यावर असून, यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, या सरकारने सध्या एकच धंदा लावला आहे. सगळीकडे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान लावले असून, कशाचा वेगवान बोडक्याचा? असे पवार म्हणाले. तर काय गतिमान, त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांची दातखीळ बसते. याचं काय झाले आहे की, याचं सरकार येऊन नऊ महिने झाले. त्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या. त्यात कशीबशी एक जागा आली. ती सुद्धा शिवसेनेचा उमेदवार घेतला. बाकी सर्वकडे त्यांचा पराभव झाला असल्याने यांचे डोळे उघडले असल्याचा टोला अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
'आनंदाच्या शिधा'वरून टीका...
यावेळी बोलताना अजित पवार यांनी आनंदाच्या शिधावरून देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं. या सरकराने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. ज्यात एक किलो रवा, साखर,चणाडाळ आणि तेल या कीटमध्ये आहे. या चार किलो काय होणार आहे. यांनी स्वतःच कुटुंबाचे नियोजन या चार किलोच्या आनंदाच्या शिधातून करून दाखवले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचं चित्र
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देखील अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी हतबल झाला आहे, गारपीट पडतेय, अवकाळी पाऊस पडतोय, कांद्याला भाव नाही, सोयाबीनची देखील अशीच अवस्था आहे. त्यात मोसंबी, द्राक्षे, केळी आणि संत्रा अशा पिकांचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. या चक्रव्यूहात आमचा शेतकरी अडकला आहे. त्याला मदत करायला हवी. पण सरकार फक्त मदत जाहीर करू म्हणून सांगत असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र असल्याचं अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :