जालना : आधी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) चर्चेत आलेल्या जालन्यात (Jalna) आता धनगर आरक्षणासाठी भव्य मोर्चा निघणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने उद्या (21 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 


जालना जिल्हा सध्या आरक्षणाच्या मागण्यांच्या केंद्रबिंदू बनला असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्याने याची राज्यभरात चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर, गेल्या आठवड्यात झालेली ओबीसी सभा देखील जालन्यातील अंबडमध्ये झाली. असे असतांना आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी देखील जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या भव्य असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 


असा निघणार मोर्चा..


धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्यात, जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा गांधी चमन येथून सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत, अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे, मोर्चाचे रूपांतर सभेत होणार असल्याचे बोऱ्हाडे यांनी सांगितले.


'या' आहेत मागण्या...



  • धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी

  • शहरातील अंबड चौफुली परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी

  • जातनिहाय जनगणना करण्यात यावी

  • मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावे, मेंढ्यांना चरण्यासाठी वने राखीव ठेवावी

  • शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा

  • प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे

  • आरक्षण लढयात शहीद झालेल्या समाजबांधवांच्या कुंटूबातील एकास शासकीय नोकरी द्यावी

  • शासनामार्फत सवलतीच्या दरात कर्ज द्यावे

  • सर्वच क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे आदी मागण्या नमुद करण्यात आल्या आहे.


पोलिसांवर सतत बंदोबस्ताचा ताण...


आंतरवाली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर हे ठिकाणी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनले आहे. मुख्यमंत्री यांच्यापासून तर मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे दौरे, राजकीय नेत्यांचे दौरे आणि राज्यभरातील मराठा बांधव यांची होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून सतत खडा पहारा दिला जात आहे. त्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारे आंदोलन आणि उपोषण यांना लागणार पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. त्यानंतर ओबीसी सभेसाठी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात, आता धनगर आरक्षणासाठी मोर्चा निघणार आहे. सोबतच, 1 डिसेंबरला मनोज जरांगे यांची देखील जालना शहरात सभा होत आहे.  त्यामुळे जालना पोलिसांवर सतत बंदोबस्ताचा ताण पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


तर ठरलं! छगन भुजबळांना जालन्यातूनच उत्तर मिळणार, मनोज जरांगेंच्या भव्य सभेचं आयोजन