Jalna Protest : जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जची घटना शुक्रवारी (23 ऑगस्ट) समोर आली होती. यावेळी जोरदार दगडफेक आणि पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यानंतर आज पुन्हा जालन्यात दगडफेक आणि लाठीचार्जची घटना समोर आली आहे. ग्रामीण भागातील कालच्या घटनेनंतर आता जालना शहरात देखील हे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वी आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झालेल्या झटापटीनंतर दगडफेक करण्यात आली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. 


जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तणावाच्या घटनेनंतर आजही शहरातील काही भागात तणाव कायम आहे. दरम्यान यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे पाहायला मिळाले. जालना शहरातील अंबड चौफुली येथे एका ट्रकला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त लावून जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला. याठिकाणी अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या. तसेच बदनापूर रोडवरील एका शासकीय वाहनाला देखील अज्ञातांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. 


कालच्या घटनेनंतर आज परिस्थिती नियंत्रणात असल्याची शक्यता होती. मात्र, ग्रामीण भागातील वादाचे लोण आज जालना शहरात देखील पसरल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अंबड चौकात आंदोलकांनी एक ट्रक पेटवून दिल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला. मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्याची माहिती आहे. तर घटनास्थळी आता दंगा काबू पथक तैनात करण्यात आला आहे. 


पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन... 


जालना येथील कालच्या घटनेनंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी वाहने देखील पेटवून देण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्ते अडवून तयार पेटवून देण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे आंदोलकांनी हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच कोणेही कायदा हातात न घेता हिसंक घटना करु नयेत असेही पोलिसांकडून सतत सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष असून, कोणेही अफवा पसरवू नयेत असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna Protest : जालना येथील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, राजकीय वातावरण तापले