जालना : प्रत्येक पक्षाने ज्यावेळी हाक मारली त्यावेळी मराठे त्यांच्या मागे राहिले, आता सरकारने मराठ्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. आरक्षण (Maratha Reservation) हाच उपचार, दुसरा कोणताही उपचार नाही असंही ते म्हणाले. जालन्यातील उपोषणाबद्दल सर्वाशी बोलून मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले. 


मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासंबधी अॅड. शिंदे यांची समिती नेमली असून त्यामध्ये जरांगे यांच्या प्रतिनिधीने यावं असं आवाहनही त्यांनी केलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 


काय म्हणाले मनोज जरांगे? 


सरकारच्या कमिटीत आमचं कुणीही जाणार नाही. समितीमध्ये जाण्याचा आम्हाला मोह नाही. सरकारने आम्हाला न्याय द्यावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले तर त्याचं स्वागत करतो. उपोषणाबाबत मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्णय घेणार. 


मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यांनी सलाईन लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, माझं गाव भावनिक झालं आहे. गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायला क्षमता राहिलेच नाही. सरकारला वेळ का पाहिजे हे कळले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार आहे. आरक्षण खरंच देणार का याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकारला वेळ टिकणारं आरक्षण देण्यासाठी हवंय की वेळा मारून नेण्यासाठी हे कळलं पाहिजे. 


आरक्षण हाच उपचार ,दुसरा कोणता उपचार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. 


दरम्यान,  मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या 14 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 15 वा दिवस आहे. तर रविवारपासून मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. तसंच त्यांनी सलाईनही काढून टाकलीय. वैद्यकीय उपचार देखील ते घेत नाहीत. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे. मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलं आहे.


ही बातमी वाचा: