जालना: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांचे पैसेही लाडक्या बहि‍णींना मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण असताना सोशल मीडियावर कार्तिक वजीर उर्फ भुऱ्याचे एक भाषण (Bhurya Speech) तुफान व्हायरल होत आहे. देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भुऱ्यानेही आपल्या शाळेत त्याच्या खास शैलीत स्वातंत्र्यदिनाचे भाषण केले. या भाषणात भुऱ्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेप्रमाणे लहान मुलांसाठीही राज्य सरकारने योजना सुरु करावी, अशी गमतीशीर मागणी केली. सरकारी योजनांमुळे तरुण मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या आळशीपणाच्या समस्येवर या भाषणातून भुऱ्याने (Kartik Wazir) तिरकस पद्धतीने भाष्य केले आहे. त्यामुळे हे भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांची घोषणा केली जात आहे. यामध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन योजना प्रचंड चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यापैकी लाडका भाऊ योजनेचा दाखला भुऱ्याने आपल्या भाषणात दिला. 


भुऱ्या भाषणात नेमकं काय म्हणाला?


तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण आमच्यासारख्या बारकाल्या पोरांना खरंच स्वातंत्र्य आहे का? कोणीही येतं आणि आमच्यासारख्या बारकाल्या पोरांना कामं सांगतं,  घरातील सगळी बारीकसारीक कामं आम्ही करतो. रानातल्या कामाला आम्हाला नेतात, सुट्टी असली की घरचं आणि रानातलं अशी दोन्ही कामं करावी लागतात. आम्हाला स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? मोठी लोकं आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत. आता सरकार मोठाल्या पोरांना पगार सुरु करणार आहे. आधीच त्यांना काही कामधंदा नाही, आता ते दिवसभर मोबाील चिवडत बसतील, पान-पुडी खातील, मोबाईल खेळून या पोरांचं डोकं हँग झालंय. सरकारने पगार सुरु केल्यावर मोठाली पोरं आता रानातलं कामही करणार नाही. मग आम्ही बारकाल्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलंय? आम्हालाही पगार सुरु झाला पाहिजे. आम्हालाही खर्चापाण्याला पैशे लागतात. त्यासाठी सरकारने बारीकसारीक लाडकं लेकरु योजना आणून आम्हाला पगार सुरु करावा, असे भुऱ्याने म्हटले.


मात्र, भुऱ्याच्या या मजेशीर भाषणाचा शेवट सरकार आणि तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला. सरकार सगळ्यांनाच पगार देत असेल तर कोणालाच काम करण्याची गरज नाही. सगळ्यांनी फुकटचं बसून खायचं. हे सगळं बंद करा, अशाने आजची पिढी कशी तयार होईल? शहाणे व्हा. कष्ट करा, त्याशिवाय पर्याय नाही. या जगात आईबापाच्या प्रेमाशिवाय काहीच मोफत मिळत नाही, असे खडे बोल भुऱ्याने आपल्या भाषणातून सुनावले. 


VIDEO: स्वातंत्र्यदिनी शाळेतील भुऱ्याचं सॉल्लिड भाषण



आणखी वाचा


मोठी बातमी ! 3000 रुपये आले होsss... लाडक्या बहि‍णींनो बँक खाते चेक करा; रक्षाबंधनाची ओवाळणी आजच जमा