जालना : आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge) येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला पुन्हा एकदा पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला दगडफेक प्रकरणात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्याच्याकडे सापडलेल्या गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस प्रकरणात आता पुन्हा अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 2 डिसेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


सध्या न्यायालयीन कोठडीत असेलला आणि आंतरवाली सराटीतील दगडफेकीचा घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालना पोलिसांकडून पुन्हा अटक करण्यात आली आहे. गावठी पिस्टल प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. न्यायाल्याकडून 2 डिसेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भारतीय हत्यार बंदी कायद्यानव्ये पोलीसांकडून ही कारवाई झाली असल्याची माहिती जालना पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


बेदरेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल


ऋषिकेश बेदरेला पोलिसांनी अटक केल्यावर तो रेकोर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ऋषिकेश बेदरेची वाळू पट्ट्यात दहशत असून, त्याच्यावर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. यात दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लूट करणे, दारू विक्री, जुगार, बदनामी करणे यासह इतर अनेक कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. 


दोन महिने 25 दिवसांनी पोलिसांनी केली अटक...


आंतरवाली सराटीमधील आंदोलनादरम्यान घडलेल्या दगडफेक, जाळपोळ आणि लाठीचार्जच्या घटनेनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गोंदी पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. ज्यात ऋषिकेश बेदरे मुख्य आरोपी होता. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी कोणालाही अटक केली नव्हती. मात्र, तब्बल दोन महिने 25 दिवसांनी पोलिसांनी अटकेची कारवाई सुरु केली आणि ऋषिकेश बेदरेसह तिघांना ताब्यात घेतले होते. यावेळी बेदरेकडे गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस सापडले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, दुसऱ्यांदा त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


दरोडा, लुटमार, दारू विक्रीसह जुगार; आंतरवाली दगडफेक प्रकरणातील आरोपीची 'क्राईम हिस्ट्री' पोलिसांकडून जाहीर