जालना : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची ओळख आता देशभरात पोहचली आहे. जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी सरकारने अनेक डाव टाकले आणि त्याप्रमाणे षडयंत्र देखील रचल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. पण, जरांगे सरकारच्या जाळ्यात अडकले नसल्याचे देखील ते म्हणाले. अत्यंत चाणाक्षपणे जरांगे यांनी सुरवातीपासूनच हे आंदोलन हातळले होते. पण, आता तेच जरांगे 'लायकी' या आपल्या एका शब्दामुळे बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर त्यांना एक पाऊल मागे घेऊन आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे सांगण्याची वेळ आली आहे.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील केले जात आहे. दरम्यान, एका सभेत बोलतांना मनोज जरांगे यांनी 'लायकी' नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले आणि गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठीच्या मुद्द्याला वेगळच वळण लागले. विशेष म्हणजे, आंदोलनाचा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या छगन भुजबळांनी हीच बाब हेरली. तसेच, यावरून हिंगोलीमधील ओबीसी महाएल्गार सभेमध्ये मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. शेवटी जरांगे यांना यामुळे एक पाऊल मागे घ्यावा लागला. सोबतच आपले शब्द आपण मागे घेत असल्याची भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली.
आपला अपराध कबूल केला?
'लायकी' शब्दाचा वापर करणाऱ्या मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकरांनी देखील महत्वाचा सल्ला देत चिमटा काढला. जरांगे यांनी सल्लागारांचा ऐकू नये असा सल्ला आंबेडकरांनी दिला. त्यामुळे, या शब्दाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आंबेडकरांच्या सल्ल्याच निमित्त पकडून जरांगे यांनी सावध भूमिका घेतली आहे. भुजबळांचं ऐकून नाही तर प्रकाश आंबेडकरांचा ऐकून आपण लायकी शब्द माघारी घेत असल्याचं जरांगे यांनी जाहीर केले आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या या माघारीमुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी आपला अपराध कबूल केल्याचं बोललं जात आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे अडकत चालले?
एकीकडे जरांगे यांना 'लायकी' शब्दावरून बॅकफुटवर जाऊन माघार घ्यावी लागली. सोबतच मागील काही दिवसांपासून घडलेल्या काही घटना आणि झालेल्या आरोपांमुळे मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्द्यावरून अडकत जाताना दिसत आहेत. वेळोवेळी बदललेल्या भूमिकेतून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याच्या नादात मनोज जरांगे यांच्यामागे काही राजकीय वरदहस्त आहे का? अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्यात आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे यांच्या तोंडी आलेल्या अनेक राजकीय टीका त्यांच्यावर शंका उपस्थित करायला भाग पाडतेय, असा आरोप होत आहे. अशातच जरांगे यांच्या अवतीभवती सुरवातीपासून आंदोलनात सक्रिय असलेल्या दगडफेकीतील आरोपी ऋषिकेश बेदरेकडे गावठी कट्टा सापडल्याने मनोज जरांगे यांचे पाय खोलात जात आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
आगामी काळातील भूमिका प्रचंड निर्णायक असणार
एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता सुरुवातीपासून अतिशय चाणाक्षपणे आंदोलन हाताळणाऱ्या मनोज जरांगे यांनी 'लायकी' शब्दावरून माघार घेऊन आपली आंदोलक म्हणून परिपक्वता दाखवली. मात्र, असे असलं तरी या पुढील त्यांच्या भूमिका प्रचंड निर्णायक असणार आहेत. तसेच, त्यातून काय साध्य होतं हे येणारा काळच सांगेल.
इतर महत्वाच्या बातम्या: