Suresh Jain जळगाव :  माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain) यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते जळगावात (Jalgaon) दाखल झाले. राजधानी एक्स्प्रेसने सुरेश जैन यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. जळगावमधील राजकारणातील मोठे नेतृत्व म्हणून माजी मंत्री सुरेश जैन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन हे भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र आता ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 
 
माजी मंत्री सुरेश जैन यांनी सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेत राजकीय संन्यास घेतला असल्याचं लेखी पत्राच्या द्वारे कळवले होते. त्यानंतर सुरेश जैन आज जळगावमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. सुरेश जैन म्हणाले की, आपण सक्रिय राजकारणाचा संन्यास घेत आहोत. वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला आहे. 


चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार 


आपण या पुढे जे चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. मात्र कोणत्याही पक्षात आपण सहभागी होणार नाही. सध्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे ते काही समाधानकारक नाही. गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात असल्याने प्रत्येक जण आपल्याशी जुळला होता. 


कुठल्याही पक्षात जाणार नाही 


या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्ष आपले फोटो वापरत असल्याने अनेक पक्षात मी कोणाच्या बाजूने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळं आपण राजकारणाचा संन्यास घेत असून या पुढे कोणत्याही पक्षात जाण्याचा किंवा राहण्याचा प्रश्न नाही. आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून माझा सर्व पक्षांना पाठिंबा असल्याचे स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी दिले आहे. पुढील काळ आपण आपल्या कुटुंबासोबत घालवणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 


सुरेश जैन यांची राजकीय कारकीर्द


माजी मंत्री सुरेश जैन हे 1980 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले. त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले. 1985 मध्ये ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले. 1990 मध्ये सरतचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले. 1995 मध्ये काँग्रेसतर्फे तर 1999 मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले. 2004 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते आमदार झाले. 2009 साली शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले. 1980 पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते सलग 34 वर्षे आमदार होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद दिले होते. 


आणखी वाचा 


Suresh Jain: बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर; जळगावात समर्थकांचा जल्लोष