जळगाव : रावेर तालुक्यातील थेरोळे  या गावात  जिल्हा परिषद शाळेत वारंवार मागणी करूनही शिक्षक दिले जात नसल्याने शाळेच्या सरपंचाने शाळेला कुलूप लावले आणि मुलांना घेऊन रावेर पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवली. शिक्षक संख्या कमी असल्याने अखेर सरपंच शुभम पाटील आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.


थेरोळे येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यात दोनच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार प्रशासनाकडे शिक्षक देण्याची मागणी करून शिक्षक मिळत नसल्याने अखेर आज गावकऱ्यांनी संतप्त होत शाळेला कुलूप ठोकले आणि सर्व विद्यार्थी घेऊन रावेर पंचायत समिती गाठले .


कोणी शिक्षक देते का शिक्षक? अशा घोषणा विद्यार्थ्यांनी रावेर पंचायत समितीच्या आवारात दिल्या. 'साहेब आम्हाला पण शिकू द्या' अशी विनंती त्या विद्यार्थ्यांनी केली. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र याच लाडक्या बहिणींच्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचं मत शालेय विद्यार्थिनींनी मांडलं. 


या सर्व प्रकारावर बोलताना थेरोळे गावचे संरपंच म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवी शाळेसाठी दोनच शिक्षक शिकवत आहेत. तर दोन जागा रिक्त आहेत. आम्ही या संदर्भात गटशिक्षण अधिकारी, बीडीओंना अनेकदा निवेदन दिले. पण त्यांच्याकडून कोणताही कारवाई झाली नाही. या जुलैमध्ये जिल्ह्यात एकूण 95 नव्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पण रावेर तालुक्याला एकही शिक्षक देण्यात आला नाही. या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि आमदार काय करतात? 


आता आंदोलन सुरू केल्यानंतर अधिकाऱ्यांचे फोन आले. आम्ही शिक्षक देतो, पण आंदोलन मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली. पण शाळेला शिक्षक मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असं सरपंच शुभम पाटील यांनी स्पष्ट केलं. 


ही बातम्या वाचा: 


सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढे ढकलतंय, मात्र...'; सुप्रिया सुळेंचा जळगावात जोरदार हल्लाबोल