Eknath Khadse:  चार कोटींची जमीन आणि चारशे कोटींचा घोटाळा हे मनाला पटणार आहे का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. गौण खनिज हे वापरण्यात आलं ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आलं, मी महसूल मंत्री असताना त्याबाबतचे आदेश काढले होते. कोणत्याही पद्धतीचे नियमबाह्य काम झालेलं नसल्याचे ही एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले. 


मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी  एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावे असलेल्या जमिनीवर  चारशे कोटींचा  गौण खनिज घोटाळा झाल्याची लढवेधी विधानसभेत मांडली. यानुसार राज्य शासनाकडून या प्रकाराच्या चौकशीसाठी आदेश देण्यात आले असून आज मुक्ताईनगर पथक येथे ईटीएस चे पथक आलेले आहे. या पथकाकडून जमिनीचे मोजमाप करण्यात आले. 


या कारवाईवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या जमिनीची तपासणी केली जात आहे ती जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी मी किंवा माझ्या कुटुंबाला नव्हे तर शंभर ते दीडशे शेतकऱ्यांनी दिली आहे. जमीन सपाटी करून करून शेतीसाठी तिचा उपयोग व्हावा हाच त्यामागचा उद्देश होता. यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे उत्खनन कशातून झालं किती झालं याची चौकशी करावी या चौकशीतून काय आहे ते बाहेर येईल असेही एकनाथ खडसे म्हणाले. 


राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जात आहे का असा प्रश्न विचारला असता त्यावर एकनाथ खडसेंनी बोलताना अख्ख्या जगाला माहित आहे असे म्हणत नाव न घेता खडसेंनी या कारवाईच्या पाठीमागे शिंदे भाजप सरकार असल्याची टीका केली आहे. 


प्रकरण काय?


नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झालं असून तब्बल 400 कोटींचा महसूल बुडवला असल्याचे आरोप केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री विखेंकडून देण्यात आल्याने मंदाकिनी खडसे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रूपयांचा घोटाळा  झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला.