Jalgaon Devendra Fadnavis : शरद पवार (Sharad Pawar) हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यावेळी ते चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षासोबत युती करून सरकार स्थापन केलं, त्याला मुत्सद्देगिरी म्हटलं गेलं, मग आमच्यासोबत युती करून निवडणूक लढवून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. मग याला मुत्सद्देगिरी का नाही म्हटलं गेले, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे अनेक नेते, मंत्री जळगाव (Jalgaon) शहरात होते. आज जळगावमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. शासन आपल्या दारी हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, जनतेचे जे सरकार आहे ते लोकांच्या दारापर्यंत जायला पाहिजे म्हणून ते लोकांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे. अनेक जिल्ह्यात दोन लाख दाखले आणि योजना पोहोचल्या आहे. जे लोकांमध्ये जात नाहीत, ते सांगतात की लोकांना जबरदस्तीने आणले जात आहे. मात्र आम्ही काम करणारे लोक असून मागचे सरकार फेसबुक लाईव्ह सरकार होते. आमचे सरकार जनतेत जाऊन काम करते. चांगलं काम करूनही काहीना पोट दुखी आहे. या वयात काळी कामे करणे सोडा, आमची कामे सुरु आहेत, मात्र इतरांचे काळे झेंडे दाखवायचे काम सुरू असल्याची टीका यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांना मानणारे रयतेचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे एकनाथ शिंदे हे भगवा झेंडा घेऊन ते आमच्या सोबत आले. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांना मानणारे युती सरकार आलं. त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार मंत्री होते, ते चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले, त्यावेळी भारतीय जनता पक्षसोबत युती करून सरकार स्थापन केलं, त्याला मुत्सद्देगिरी म्हटलं गेलं, मग आमच्यासोबत युती करून निवडणूक लढवून उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. मग याला मुत्सद्देगिरी का नाही म्हटली गेली? त्याला एक म्हणाल, याला एक म्हणाल, हे चालणार नाही. त्यामुळे जे लोक याला बेईमानी म्हणतात, ते लोकच खरे गद्दार आहेत. पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता त्यांना जनता जागा दाखवून देईल, असा इशारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
जळगाव जिल्ह्यात कामांचा सपाटा
गिरीश महाजन यांनी मागील काळात काही प्रकल्प सुरू केले होते. मात्र नंतर सरकार बदलले. त्यामुळे निधी न मिळाल्याने कामे पूर्ण होऊ शकली नव्हती. मात्र पाण्यासाठी पैसे कमी पडू देणार नसल्याचं फडणीस यांनी म्हटल आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कांदा चाळी जळगाव जिल्ह्यात आहे. सतत पावसाची व्याख्या करून त्यानुसार नुकसान भरपाई आता मिळणारं आहे. कापूस दर कमी आहेत, हे खरे आहे. मात्र यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने आताच हमी भाव वाढवत नेत सात हजारावर नेला आहे. आता घरातील कापसाला चांगला भाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जल जीवन मिशनची जबदरी गुलाबराव पाटील यांच्याकडे असून त्यांच्याकडून चांगल काम होत असल्याने अनेक गावात पाणी योजना पूर्ण होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती म्हणून 179 कोटी रुपये दिले. जिल्ह्यातील 1 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात येऊन 50 हजार शेतकऱ्यांना विम्याचे 34 कोटी रुपये दिल्याचे फडणवीस म्हणाले.