Gulabrao Patil : सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अधून मधून पाऊस पडत आहे. मात्र, शेती पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज आहे. कारण पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिकं माना टाकू लागली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळं जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली आहे. याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले. 


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही सुरु करण्यात आले आहेत. तर भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिकृत करण्यासह विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहेत. पाऊस पडावा यासाठी आपण देवाला प्रार्थना करु. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः.. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पडण्याबाबत प्रश्न मांडला असल्याचे पाटील म्हणाले. 


शास्रज्ञांशी चर्चा करुन अंतिम निर्णय


कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबत शासनाच्या चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्यात अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. 


विहरी आणि बोअरवेलचे पाणीपातळी घटली


यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस पडत नाही त्यात विहिरीत पाणी नसल्याने पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. त्यात पाणी नसल्याने डोळ्यासमोर पिकं उध्वस्त होत असल्याने त्याला जगवण्यासाठी बळीराजा धरपड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक भागात शेतकरी हाताने पिकांना पाणी टाकताना पाहायला मिळत आहे.  यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी 20 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकं आता माना टाकताना पाहायला मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


पावसाची दडी! पिकं वाचवण्यासाठी तांब्याने पाणी घालण्याची वेळ, थेंब-थेंब पाणी टाकून शेती जगवण्याची बळीराजाची धडपड