Jalgaon Bajar Samiti : जळगाव जिल्ह्यात (Jalgoan) धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट मैदानात उतरला आहे. या प्रचारपत्रकासह फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.


राज्यात काहीही चित्र असला तरी जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena), भाजप -राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आल्याचे अजब असे चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे  मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मतदारसंघातल्या धरणगाव तालुक्याच्या बाजार समितीच्या (Dharangaon Bajar Samiti) निवडणुकीत शिवसेना शिंदे गट भाजप व राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या सहकार पॅनलच्या प्रचाराच्या पॉम्पलेटवर शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचेही छायाचित्र असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असल्याचा पाहायला मिळत आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bajar Samiti Election) निवडणुकांमध्ये धरणगाव वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असा सामना होत आहे. धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी युती करून सहकार पॅनल रिंगणात उतरविले आहे. या पॅनलच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचाही फोटो झळकत आहे. त्यामुळे राज्यात जरी भाजप व शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधक असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र धरणगावातील बाजार समितीच्या निवडणुकीत हे तिघही पक्ष एकत्र झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत .


अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत : गुलाबराव पाटील


राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी शिवसेना-भाजपसोबत युती करीत बाजार समितीत उमेदवार उभे केले आहेत. याआधीही दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवारांनी शिवसेना-भाजपला साथ दिली होती. धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप- शिंदे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील गटबाजी पाहायला मिळत आहे. अर्धी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शेतकरी टिकेल तर शेत पिकेल, असे म्हणत भाजप-शिव शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सहकार पॅनल या निवडणुकीत उभे करण्यात आले आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचे फोटो एकाच फलकावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


जळगाव बाजारसमितीचे चित्र स्पष्ट 


जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणुकीत तब्बल 148 जणांनी माघार घेतल्याने आता 51 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. गुरुवारी माघारीच्या अंतिम दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. भाजप- शिंदे गटाच्या पॅनलचे नेतृत्व करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेते राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा मतदारसंघ असल्याने या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व भाजप-शिवसेना शिंदे गटात आमने-सामने लढत होणार आहे.