Jalgaon Grampanchayat : जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील जामनेर मधील टाकळी खुर्द गावामधून एक धक्कादायक बातमी आलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील (Grampanchayat) निकालानंतर विजयी व पराभूत असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येवून वाद होऊन हाणामारी व दगडफेक झाली. या  दगडफेकीत विजयी उमेदवाराच्या भावाचा मृत्यू (Death) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 


दरम्यान राज्यभरात आज ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील अनेक ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यातील जामनेर तालुक्यात टाकळी निवडणूक निकालानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. टाकळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी असे या मयत कार्यकर्त्याचं नाव आहे. पराभूत झालेल्या झालेल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली. त्या दगडफेकीत धनराज माळी याचा मृत्यू झाल्याचा आरोप धनराज माळी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.


जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावाची ग्रामपंचायतीची निवडणूक होती. भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीत रिंगणात होते.  या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी हा सरपंच पदासाठी उभा होता. यादरम्यान गावातील देवीच्या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी जात असताना यावेळी एका घरावर दबा धरून बसलेल्या काही जणांनी अचानक धनराज माळी याच्यावर त्याच्या सोबत असलेल्या इतरांवर दगडफेक झाली. तसेच काही जणांनी लाठ्या काठ्या हल्ला चढविला. यावेळी डोक्यात दगड लागून दुखापत झाल्याने धनराज माळी हा जखमी झाला होता. या घटनेत जखमी धनराजला जामनेर येथील रुग्णालयात हलवित असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.


दरम्यान गावातील विजय मिरवणूक सुरू असताना यादरम्यान पराभूत पॅनलचे कार्यकर्ते व विजयी पॅनलचे कार्यकर्ते हे समोर आल्याने झालेल्या हाणामारी व दगड फेकीत यात धनराज माळी याचा मृत्यू झाल्याची ही चर्चा यावेळी सुरू होती. दगड फेकीत धनराज माळी यामध्ये गंभीर अवस्थेमध्ये जखमी झालेला होता. त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याने वातावरण चिघळले आहे. घटनेनंतर पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे 20-25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जामनेरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांचा प्रचंड आक्रोश सुरू आहे.  या घटनेने जामनेरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठी खळबळ उडाली आहे.