Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वनोली (Vanoli) येथे साईबाबांच्या मंदिरात (Sai Baba Temple) अनेक वर्षांची नंदादीप तेवत राहण्याची अनोखी परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्राही भरत असते. जागृत देवस्थान असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं.
काय आहे आख्यायिका?
प्राचीन काळात दुष्काळाची परिस्थिती असताना त्यावेळी तेल मिळत नसल्याने, या ठिकाणी तेलाऐवजी साईबाबांनी पाणी टाकून या ठिकाणी दिवे पेटवले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिरात त्या काळी साई बाबांचे वास्तव्य असल्याचं देवस्थानाचे विश्वस्त सांगतात. साईबाबांनी हे दिवे पेटविल्यापासून आजपर्यंत हे दिवे अखंडपणे पेटलेले आहेत. या ठिकाणी नागरिक तेल घेऊन येत असतात आणि दिव्यांमध्ये तेल टाकतात. त्यामुळे या ठिकाणचे दिवे तेवत राहण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही कायम असल्याचे पाहायला मिळते. जागृत देवस्थान तसेच मनोकामना पूर्ण करणाऱ्या साईबाबा अशी या देवस्थानाची ओळख असल्याने नवरात्र उत्सवात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
भाविकांच्या श्रद्धेचं स्थान :
या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याची श्रद्धा आहे. अनेकांचा तसा अनुभवही असल्याने अनेक भाविक आपल्या परीने नवस बोलत असल्याचं येथील विश्वस्त सांगतात.
नवरात्र उत्सवात अष्टमी आणि नववीच्या दिवशी या देवस्थानाच्या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. देवकाठी फिरविण्याचा कार्यक्रमही या ठिकाणी होत असतो. मनोकामना पूर्ण होत असल्याने तसेच जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी जिल्हा पुरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. नवमीच्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचाही मोठा कार्यक्रम होतो. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात.
महत्वाच्या बातम्या :