Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी प्रा उत्राण (Pimpri Pra Utran)  गावाला तिन्ही बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा दिला आहे. या पुराच्या पाण्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी प्रा उत्राण गावातील विद्यार्थी मोंढाळा गावात शिक्षणासाठी जातात. मात्र, पाण्यामुळं मोंढाळा गावात जाण्यासाठी आता रस्ताच नाही. त्यामुळं गेल्या दोन महिन्यापासून पिंपरी प्रा उत्राण या गावचे 70 ते 80 विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.


एका बाजूला पिंपरी प्रा उत्राण गावाला तिन्ही बाजूनं पाण्यानं वेढा दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला खराब रस्ता असून, त्यामार्गे मोंढाळा गावात पोहोचण्यासाठी 16 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी प्रा उत्राण या गावाला लागून बोरी नदी आहे. या बोरी नदीच्या काठावर मोंढाळा आणि पिंपरी ही दोन गाव आहेत. पिंपरी प्रा उत्राण गावात प्राथमिक शाळा आहे तर मोंढाळा गावात माध्यमिक शाळा आहे. या मध्यामिक शाळेसाठी पिंपरी प्रा उत्राण गावातील 70 ते 80 मुले मोंढाळा गावात शिक्षण घेण्यासाठी नदी पात्रातून जातात. पाऊस झाल्यानंतर काही वेळ पाणी वाढल्यानंतर लगेच पाणी कमी होत असल्यानं आजपर्यंत फारशी अडचण आली नव्हती. मात्र, सध्या भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.




नदीतल्या बंधाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी, पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी


मागील वर्षी बोरी नदी पात्रात ठिक-ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्यानं या बंधाऱ्यांमुळं या भागात नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिलं आहे. विद्यार्थांना पिंपरी गावातून मोंढाळा गावात जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण गावाला तिन्ही बाजूने बोरी नदीने विळखा घातला आहे. तर दुसरीकडं एक बाजूने रस्ता असला तरी त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्यानं या रस्त्यावरून एसटी अथवा इतर कोणतेही वाहनाला जाता येत नाही. शिवाय केवळ पाचशे मीटर अंतर जाण्यासाठी 16 किलोमीटर अंतर फिरुन यावे लागत आहे. त्यामुळं वाहनाअभावी आणि खर्च विचार करता पिंपरी गावातील 70 ते 80 विद्यार्थ्यांना आता शाळेत जाण्याऐवजी घरीच राहणं पसंत केल्यानं या मुलांचं शैक्षणिक भवितव्य अंधारमय झालं आहे. या गावालगत असलेल्या बोरी नदीवर शासनाने तातडीने पुल बांधायला पाहिजे अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. 


शाळेत जाता येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान


नदीवर पूल नसल्यानं गावातील मुले दोन महिन्यापासून शाळेत जाऊ शकली नाहीत. खासदारांसह मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमची समस्या सांगितली आहे. त्यांनी लवकरात लवकर पुल बांधून द्यावा अशी आमची मागणी असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. काही जण मोटार सायकलने प्रवास करुन आपली वेळ भागवत आहेत. मात्र ज्यांच्याकडे वाहन व्यवस्था नाही त्यांची मोठी अडचण निर्माण झाल्याची माहिती सरपंच जोसना पगारे यांनी दिली. गावाला पाण्याचा वेढा असल्याने गावातील मुले शिक्षण घेण्यासाठी शेजारच्या गावात असलेल्या शाळेत जाऊ शकत नसल्याने मोठ्या संख्येनं विद्यार्थी घरीच राहत आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन पातळीवर आमची अडचण सांगूनसुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यानं तातडीने पुल बांधून समस्या सोडवावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.




आमचं शिक्षण कसं पूर्ण करायचं? विद्यार्थ्यांचा सवाल


नयन पाटील हा विद्यार्थी पिंपरी प्रा उत्राण गावात राहतोय त्याचे वडील शेती करतात. शेजारच्या मोंढाळा गावात तो इयत्ता दहावी वर्गात शिकतो. गेल्या दोन महिन्यांपासून नदीला पाणी वाढल्यानं आणि इतर दुसरा रस्ता चांगला नसल्यानं तो शाळेत गेलेला नाही. त्यामुळं त्याचा अभ्यास होत नाही. घरीच पुस्तके वाचून तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, शिक्षक ज्या पद्धतीनं शिकवतात ते लगेच लक्षात येते होते. आता मात्र शिक्षण घेता येत नसल्याने अभ्यास होत नाही. आता आम्ही आमचं शिक्षण कसं पूर्ण करायचं असा प्रश्न नयन विचारत आहे.


रस्ता नसल्यानं शेती करणं आणि गुरे पालन करणे कठीण


बोरी नदीवर बंधारे बांधले गेल्यानं नदीला बारा महिने पाणी राहत आहे. त्यामुळं विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. शिवाय अनेक शेतकऱ्यांची मोंढाळा गावात शेती आहे. मात्र, रस्ता नसल्यानं शेती करणं आणि गुरे पालन करणे कठीण झालं आहे. त्यामुळं मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं शासनानं तातडीनं या ठिकाणी पुलाची उभारणी करुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




आरोग्य विषयक जबाबदारी पार पाडताना अडचणी


गावातील महिलांच्या आरोग्य विषयक जबाबदारी  पार पाडत असताना बऱ्याच वेळा महिलांना प्रसूतीसाठी शेजारच्या गावात नेण्याचा प्रसंग येतो. मात्र, कोणतीही वाहन व्यवस्था नसल्याने, अशा प्रसंगी या महिलांना प्रसूतीसाठी दवाखान्यात नेणे अतिशय कठीण झाले आहे. रस्ता खराब आणि अतिशय दुरून फिरून जावे  लागत असल्यानं एखाद्या महिलेवर रस्त्यातच प्रसूती होण्याची शक्यता आहे. यात काही दुखापत झाली तर जबाबदार कोण? असा प्रश्न
अंगणवाडी सेविका निर्मला पाटील यांनी उपस्थित केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: