Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Cotton Farmers) एकीमुळं जळगावमधील जीनिंग आणि प्रेसिंग उद्योग (Ginning and Pressing Industries in Jalgaon) अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदा कापूस उत्पादन (Cotton production) चांगलं झाले आहे. मात्र, भाव कमी असल्यानं अद्यापपर्यंत केवळ पंधरा ते वीस टक्के कापूसच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर आणला आहे. दर कमी असल्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका कापूस जिनींग उद्योगाला बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील 150 पैकी 75 जीनींग या बंद ठेवल्या आहेत. तर उर्वरित ज्या सुरू आहेत त्या देखील निम्म्या क्षमतेने सुरु असल्यानं जिनींग उद्योग संकटात आला आहे. 


यंदा काही ठिकाणी अतविृष्टीचा कापूस पिकाला फटका बसला आहे. मात्र, काही ठिकाणी कापसाचे पीक चांगले आले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून कापसाला वाचवण्यात काही ठिकाणचे शेतकरी यशस्वी झाले आहेत. त्या शेतकऱ्यांचा शेतमाल आता बाजारात विक्रीसाठी येत आहे. मात्र, कापसाला सध्या बाजारात कमी दर मिळत असल्यानं शेतकरी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. मागील वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारापासून ते 13 हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, हा कापूस दर अद्यापही साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला असल्यानं अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच राखून ठेवणं पसंत केलं आहे.


गुजरातच्या निवडणुकीचा दरांवर झाला होता परिणाम 


गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) रणधुमाळीमुळं  गुजरातमध्ये कापसाची खरेदी मंदावली होती. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कापसाच्या दरावर झाला होता. गुजरातमध्ये खरेदी मंदावल्यानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाल्यानं दरात राज्यात कापूस दरात दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, गुजरात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळं आता तरी तिथे कापसाच्या खरेदीत सुधारणा होणार का? महाराष्ट्रात कापसाचे दर वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


कापसाच्या मुख्य बाजारपेठा मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये


कापूस खरेदीच्या मुख्य बाजारपेठा या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात आहेत. निवडणुकीमुळे गुजरातमध्ये कापूस मार्केटमध्ये व्यवहार मंदावले होते. त्यामुळं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कापसाची आवक वाढली होती. आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत. मात्र, आता गुजरातची निवडणूक झाली आहे. त्यामुळं निवडणुकीनंतर कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता देखील जाणकारांनी व्यक्त केली होती. मात्र, अद्या पकापसाच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. त्यामुळं दर वाढणार कधी? हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Cotton Price : निवडणुकीमुळं गुजरातमध्ये कापसाची खरेदी मंदावली, महाराष्ट्रात दरात घसरण, नंदूरबारमध्ये शेतकऱ्यांकडून विक्री बंद