जळगाव: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच 20 ते 25 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने त्या ठिकाणच्या महिलांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. गेल्या पंचवीस दिवसांपासून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदारसंघात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं दिसून येतंय. तीन ते चार किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. 


धरणगाव शहरात तब्बल महिन्याभरापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. हिवाळ्यातच तीव्र अशा पाणी टंचाईमुळे घरातील महिला पुरुषांसह शाळकरी मुलांनाही पाण्यासाठी घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर जावं लागत आहे. याच कारणामुळे मुलांना शाळा बुडवण्याची वेळ आली असल्याचं विदारक चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय.


जळगाव जिल्ह्यातला धरणगाव तालुका हा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा तालुका, आणि मतदारसंघसुद्धा. या धरणगाव शहरात पावसाळा संपत नाही तोच, हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचं चित्र आहे. एक दोन-नव्हे तर तब्बल 20 ते 25 दिवसाआड तर कधी महिनाभरानंतर पाणीपुरवठा होतोय. तर कधी-कधी या ठिकाणी पाणी पुरवठाच होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
 
पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन, जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावं लागत आहे. तर पाणी भरण्यासाठी शाळकरी मुलांनाही शाळा बुडवावी लागत आहे. घरातील सदस्य दिवसभर पाणी भरतात, तर मग काम करायचं कसं? आणि काम करणार नाही तर घरात खायचं काय? जगायचं कसं? असा प्रश्न महिला उपस्थित करतात. 


या ठिकाणी कधी टँकर बोलवावे लागते, तर पिण्याच्या पाण्यासाठी जार मागवावे लागतात. असा आर्थिक भुर्दंडही यामुळे सहन करावा लागतोय. पाण्याच्या या समस्येमुळे घरी पाहुणेसुध्दा येत नसल्याचं सांगत महिला संताप व्यक्त करतात. इतर ठिकाणचे सोडा, आधी पाणीपुरवठा मंत्र्यांनी किमान त्यांच्या मतदारसंघात, ते राहत असलेल्या तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणीही या महिला करताना दिसून येत आहे.


राज्याच्या मंत्र्यांचा प्रशासनावर कुठलाही वचक नाही, नगर पालिकेचा नियोजनशून्य कारभार आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. मंत्र्यांनी राज्यात 22 हजार पाणी पुरवठा योजना मंजूर करून विक्रम केला असेल, मात्र त्यांच्यात तालुक्यात नागरिकांना पाणी मिळत नसेल तर त्याला काय अर्थ आहे असं विरोधकांचं मत आहे. निवेदन, आंदोलन करून कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण नाही, असंच यावरून दिसून येत असल्याची टीका विरोधक करतात.


या पाणीटंचाईवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "धरणगाव शहराला  पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारीत पावसामुळे गाळ साचल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यातच ज्या नदीत ही मोटर ठेवली आहे,  ती मोटर नदीत पाणी वाढल्याने बुडाली आहे. ती दुरुस्त करता येत नाही. तर मग आकाशातून पाणी देणार का? पाणीटंचाईची निर्माण झाली आहे ती तांत्रिक दृष्टीने निर्माण झाली आहे. त्याचे कोणी भांडवल करू नये."


राज्यात पाणीपुरवठा योजनांची कामं करून विक्रम केल्याचं मंत्री गुलाबराव पाटील सांगतात. मात्र त्यांच्याच तालुक्यात नागरिकांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल तर मंत्र्यांच्या विक्रमाला काही अर्थ आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.