Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे (Manda Khadse) आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यात होत आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे
रक्षा खडसे यांची गोची
जळगाव दूध संघाच्या निवडणुकीमुळे भाजप खासदार रक्षा खडसे यांची चांगलीच गोची झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे नेते हे रक्षा खडसे यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात मुक्ताईनगर इथे प्रचार मेळाव्यात खडसे परिवाराच्या घराणेशाहीसह दूध संघातील अपहार प्रकरणात जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याच परिवाराच्या विरोधात ही टीका ऐकत असताना खासदार रक्षा खडसे यांची मात्र चांगलीच गोची होताना दिसून येत आहे. मात्र महाभारतात ज्याप्रमाणे कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाला आपल्याच लोकांच्या विरोधात लढावे लागले होते, त्याच पद्धतीने राजकारणात आता खासदार रक्षा खडसे यांनाही आपल्या पक्षाशी आणि नेत्यांशी बांधिलकी दाखवत आपल्याच सासूच्याविरोधात प्रचारात उतरावे लागले आहे.
सासू-सुनेमधील लढाई चर्चेचा विषय
भाजपा आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलला विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. रविवारी (4 डिसेंबर) मुक्ताईनगर इथे पार पडलेल्या दूध संघ निवडणूक प्रचार मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं व्यवस्थापन करु पाहणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायला पाहिजे, त्यांना विजयी केले पाहिजे असं सांगत आपल्या शेतकरी विकास पॅनलला विजय करण्याचं आवाहन रक्षा खडसे यांनी केले आहे. त्यांचे हे आवाहन म्हणजे त्यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात आहे. ही लढाई लढण्यासाठी खासदार रक्षा खडसे या मैदानात उतरल्या असल्या तरी त्यात त्यांना यश मिळते की सासू मंदाताई खडसे यांना यश मिळते हे लवकरच कळणार आहे. परंतु सध्या तरी राजकीय क्षेत्रात या सासू आणि सुनेमधील लढाई मात्र चर्चेचा विषय बनली आहे.