जळगाव : "मी आमदार होणार नाही याची पर्वा नाही. मात्र शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार हा पक्ष आहे," असं आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले. मात्र हे सांगत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं. पण चूक लक्षात येताच माफी मागत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. "आज-काल हिजडे सुद्धा आमदार होतात," असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी जळगावमधील (Jalgaon) प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Janshakti Party) वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात केलं होतं. परंतु "आपल्याला आज-काल आंडू पांडू लोकही आमदार होतात असं आपल्याला म्हणायचं होतं," अशी सारवासारव बच्चू कडू यांनी केली.


कडूंचं वादग्रस्त वक्तव्य


आमदार बच्चू कडू हे रविवारी (17 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असे लोकही आमदार होतात. हिजडे सुद्धा आमदार होतात."


चूक लक्षात येताच माफी


मात्र मेळाव्यातील भाषणात बोलताना चूक झाल्याचं त्यांचं लक्षात आलं. चुकीची कबुली देत पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली आणि या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आंडू-पांडू लोकही आमदार होतात असा माझा म्हणण्याचा उद्देश होता, असं बच्चू कडू यांन यावेळी स्पष्ट केलं.


काँग्रेस रॅलीत मुलाचा मृत्यू, बच्चू कडू यांचा हल्लाबोल


दरम्यान जळगावातील सावदा इथे काँग्रेसच्या रॅलीत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. या घटनेचाही बच्चू कडू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रकार प्रहार जनशक्ती खपवून घेणार नाही, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.


हेही वाचा


Bacchu Kadu : नणंद भावजय वादात भाऊंची उडी; बच्चू कडू म्हणाले, 'त्यांचं' काय चुकलं?