अमरावती : यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वादात आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उडी घेतली आहे. मानहानीच्या दाव्याबाबत यशोमतीताईंचं काय चुकलं असं म्हणत नवनीत राणा यांनी पैसे दिल्याच्या आरोपांबाबत आम्ही पत्र देणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. पैसे देणारा आणि घेणारा दोघेही दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. ते अमरावतीमध्ये (Amravati) एबीपी माझाशी बोलत होते.
बच्चू कडू काय म्हणाले?
"नवनीत राणा यांनी पैसे दिल्याच्या आरोपांबाबत आम्ही एक पत्र देणार आहोत. कारण पैसे देणाराही तेवढाच दोषी आहे. पैसे कोणी दिले, कोणी घेतले याबाबत आम्ही चौकशीची मागणी करणार आहोत. मानहानीच्या दाव्याबाबत यशोमती ताईंचं काय चुकलं? स्वतः उमेदवार सांगत आहे की निवडणुकीच्या वेळेस पैसे दिले, मग पहिला दोषी कोण आहे? पैसे देणारा आणि घेणारा दोघेही दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे," असं बच्चू कडू म्हणाले.
यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातील वाद
लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतले, मात्र प्रचार दुसऱ्याचाच केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. नवरा-बायको जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहेत. निवडणूक आयोग झोपा काढत आहे का? ईडी काय करत आहे? देवेंद्र फडणवीस पाठिशी घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण त्यांना दहीहंडी कार्यक्रमात यायला वेळ आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार
दरम्यान नवनीत राणांच्या आरोपांनंतर यशोमती ठाकूर यांनी कोर्टाचा दार ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करुन निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
VIDEO : Bachchu Kadu : यशोमती ठाकूर विरुद्ध राणा दाम्पत्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले...
हेही वाचा