Jalgaon: शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला (Journalist) मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.


मारेकऱ्यांचे आमदार किशोर पाटलांसोबत फोटो - संदीप महाजन


संपूर्ण प्रकरण हे अंगाशी आलं म्हणून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत, असं पत्रकार संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. मारहाण करणारे तिघे आमदार किशोर पाटील यांचेच कार्यकर्ते आहेत आणि याचा पुरावा म्हणून त्या तिघांचे आमदार किशोर पाटील यांच्यासोबतचे फोटो दाखवू शकतो, असं पत्रकार संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. मारहाणीच्या घटनेचा आमदार किशोर पाटील यांनी स्वत:च निषेध व्यक्त केला, ही सगळी नौटंकी असल्याचं पत्रकार महाजन यांनी म्हटलं आहे.


पोलिसांकडे केली होती संरक्षणाची मागणी


अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली होती. तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि त्यांचे सहकारी असतील, असं सुद्धा पत्रकार महाजन यांनी म्हटलं होतं. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं, असं पत्रकार महाजन म्हणाले.


याआधी संरक्षण मागूनही दिलं गेलं नाही


दरम्यान, मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आधी मला शिव्या दिल्या गेल्या. आता मला मारहाण झाली आहे. याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणालो होतो. मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही. आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय. मला आणि माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील"


पत्रकारितेचा चुकीचा वापर केलेला नाही


आमदार किशोर पाटील यांच्या नावासमोर आप्पा जो शब्द लागला आहे, तो फक्त पत्रकार संदीप महाजन यांच्यामुळेच लागला आहे. गेल्या पंचवीस वर्षात पत्रकारिता करत असताना पत्रकारितेचा वापर करून कुणालाही त्रास दिला नसल्याचं पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. ब्लॅकमेलिंग किंवा इतर कुठल्या बाबतची माझ्या विरोधात तक्रार अथवा गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल नसल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं.


आमदारांकडून पत्रकारावर खोटे आरोप


आमदार किशोर पाटील कुठल्याही पद्धतीचे वेगवेगळे खोटे आरोप माझ्यावर करत आहेत, असं पत्रकार संदीप महाजन म्हणाले. आमदार किशोर पाटील यांनी माझ्यासमोर बसून आरोप करावेत आणि सिद्ध करून दाखवावे, असं आव्हान देखील पत्रकार संदीप महाजन यांनी केलं आहे. मी केलेल्या बातमीत कुठल्याही पद्धतीने कुणाचा अपमान होईल असे शब्द वापरले नसल्याचंही महाजन यांनी स्पष्ट केलं.


नेमकं प्रकरण काय?


जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली होती. ही बातमी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली आणि किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारी (10 ऑगस्ट) पत्रकार महाजन यांना मारहाणही करण्यात आली.


हेही वाचा:


Mumbai: पोलीस भरती परीक्षेत ब्लूटूथ हेडफोन वापरुन कॉपी; उत्तर पत्रिकेतील एका चुकीमुळे कॉपी करणारे अटकेत