जळगाव : श्रावण सोमवार (Shraani Somwar) निमित्त जळगाव जिल्ह्यातील रामेश्वर तीर्थक्षेत्रावर (Rameshwer) काढण्यात आलेल्या कावड यात्रेनंतर पोहण्याचा मोह तीन तरुणांच्या जीवावर बेतला आहे. कावड यात्रेत सहभागी होण्यापूर्वी नदीत अंघोळीसाठी गेलेले तीन तरुण तापी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी शिंपी कुटुंबियातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.


पियुष रवींद्र शिंपी, सागर अनिल शिंपी, अक्षय प्रवीण शिंपी अशी या तिघांची नावे आहेत. एकाच वेळी शिंपी कुटुंबियातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एरंडोल (Erandol) येथील भगवा चौकातील काही तरुण कावड यात्रा घेऊन आले होते. सोमवारी पहाटे तीन वाजता भगव्या चौकापासून वाजत गाजत रामेश्वर येथे कावड यात्रेला निघाली. ही यात्रा रामेश्वर येथे दोन वाजेच्या सुमारास पोचली. तेथे तरुणांनी रामेश्वर मंदिरात दर्शन घेतले.  सर्व पूजा अर्चा झाली. त्यानंतर पियुष, सागर आणि अक्षय हे तिघेही पोहण्यासाठी तापी नदीपात्रात उतरले. त्यावेळी एकजण वाहून जात असल्याचे इतर दोघांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तिघेही पाण्याच्या प्रवाहात (Drowned) वाहून गेले. 


यावेळी नदी काठावर असलेल्या काही जणांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ते तिघेही वाहून गेले होते. गावातील सराईत पोहणाऱ्या तरुणांनी नदीमध्ये जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिघेजण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, जळगावचे (Jalgaon) तहसीलदार नामदेव पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार त्यांचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच धुळ्यातील एसडीआरएफचे पथक देखील दाखल झाले. तिघांचा शोध सुरू असताना संध्याकाळी पाच वाजेदरम्यान त्रिवेणी संगमानजीक एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या काही अंतरावर दुसरा मृत्यू सापडला. तर आज सकाळी तिसरा मृतदेह पथकाच्या हाती लागला आहे.


कुटुंबांवर दुःखाचा डोंगर 


अक्षय हा बारावीनंतर आयटीआय झाला होता. गेल्या सात वर्षापासून तो स्वतःच्या दुकान भावासोबत सांभाळतो.  पियूष शिंपी हा देखील बारावीनंतर आयटीआय झाला होता. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत होता. हे तिघेही तरुण भाऊबंद असून अविवाहित आहेत. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल परिसरातील दुकानदारांनी स्वयं स्फूर्तीने दुकाने बंद केली. जवळपास सात आठ वर्षांपासून एरंडोल येथून रामेश्वरला कावड यात्रा नेली जाते. मात्र हीच कावड यात्रा घेऊन जात असताना तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शिंपी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


इतर महत्वाची बातमी : 


चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जण बुडाले तर मालाडमध्ये तीन जणांचा बूडून मृत्यू