Maharshtra News : मुंबईच्या मालाडमध्ये आणि चंद्रपूरमध्ये दुर्देवी घटना घडल्या आहेत. चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जणांचा बूडून मृत्यू झालाय तर मालाडमध्ये तीन तरुण समुद्रात बुडाले आहेत. या दोन्ही दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये मित्रा वाचवण्याच्या नादात अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 


सेल्फीच्या नादात तलावात पडला, वाचवायला गेलेले तिघेही बुडाले


चंद्रपूरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांचा बुडून मृत्यू झाला.  नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलावावरील येथे घटना घडली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक पावसाळा सुरु झाल्यामुळे सहलीसाठी गेले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला, त्याला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य 3 युवकांना देखील जलसमाधी मिळाली. दरम्यान स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य  सुरू आहे. चंद्रपूर जिल्हास्थानाहून अधिक बचाव कुमक शोधकार्यासाठी रवाना केली जात आहे. पोलीसही घटनास्थळी पोहचले आहेत.  


मालाडमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू - 


मुंबईजवळील मालाड मार्वे बीचवर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी मालवणी मधून समुद्रात पोहायला गेलेले 5 पैकी 3 मुलं बुडाली. मालवणी परिसरांमधून आज सकाळी 9 च्या सुमारास पाच लहान मुलांचे ग्रुप मालाड मार्वे बीचवर समुद्रात पोहायला आला होता. यातील पाचही मुले समुद्रात पोहायला गेले असता, तीन मुलं समुद्रात बुडून गेली तर दोन मुलं सुखरूप बाहेर आलेत...


शुभम राजकुमार जयस्वाल वय 12 वर्षे, निखिल साजिद कायमकुर वय 13 वर्ष,अजय जितेंद्र हरिजन वय 12 वर्ष असे समुद्रात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, मुंबई महापालिकाचे लाईफ गार्ड आणि कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तब्बल पाच तासापासून समुद्रात सर्च ऑपरेशन केले जात आहे.. कोस्टगार्डचा हेलिकॉप्टर च्या माध्यमातून मुलांच्या समुद्रात शोध मोहीम सुरू आहे.


वसईच्या चिंचोटी धबधब्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू


वसईच्या चिंचोटी धबधब्यात तीन युवकांचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि नालासोपारा येथून युवकांचा ग्रुप गेला होता. यात मुंबईच्या विलेपार्ले येथील राहणारा 18 वर्षीय सुमित राधेश्याम यादव या मुलाच मृत्यू झाला होता. गुरुवारी नालासापोरातील 18 वर्षीय रोशन राठोड आणि 19 वर्षीय रवी झा या दोघा युवकांचाही मृत्यू झाला.   नायगांव पोलिसांनी खबरदारी म्हणून धबधब्यावर कुणी जावू नये म्हणून पोलीस गस्त वाढवली आहे. मिरा भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत पावसाळ्यात धबधबे, धरण, आणि समुद्रकिनारी फिरण्यास मनाई आदेश आहे. असे असताना पर्यटक अशा ठिकाणी जात असतात.