Jalgaon Crimeकर्जाच्या (Loan) वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीचे लोकांना घरी पाठवलं जात असल्याचा आरोप करत काही जणांनी बजाज फायनान्स (Bajaj Finance) कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या अमळनेर (Amalner) तालुक्यात मंगळवारी (10 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे राजकीय पक्षाच्या एका तालुका अध्यक्षाने ही तोडफोड केली असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु असं असलं तरी त्याला कोणताही अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकलेला नाही.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरातील न्यू एरिया प्लॉट भागात बजाज फायनान्सचे ऑफिस आहे. या कार्यालयात संध्याकाळच्या सुमारास काही कार्यकर्ते घुसले आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी तिथले संगणक, लॅपटॉपसह जे दिसेल त्याची तोडफोड केली. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याने त्या ठिकाणचे कर्मचारी घाबरुन कार्यालयातून पळून गेले.


हफ्त्याच्या वसुलीसाठी घरी केलेल्या कर्मचाऱ्यांनी महिलांना अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप


शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने बजाज फायनान्सकडून लोन घेतलं होतं. त्यांनी घेतलेल्या कर्जाचा एक हफ्ता थकला होता. हा हफ्ता भरण्याच्या मागणीसाठी बजाज फायनान्सचे कर्मचारी त्या पदाधिकाऱ्याकडे गेले होते. परंतु पदाधिकारी घरी नसताना फायनान्स कर्मचारी महिलांना अरेरावीची भाषा करुन आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यातच बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडूनही आल्या होत्या. हे कर्मचारी शिवीगाळ करुन पैसे भरण्यासाठी धमकावत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे. याच कारणावरुन राजकीय पक्षाच्या या पदाधिकाऱ्याने सायंकाळच्या सुमारास काही कार्यकर्त्यांना घेऊन बजाज फायनान्समध्ये प्रवेश करत त्या ठिकाणी तोडफोड केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. कार्यकर्त्यांनी ऑफिसमधील टेबल, खुर्च्या, संगणकाची तोडफोड केली. यावेळी घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तिथून पळ काढला. 


शिंदे गटाचा तो पदाधिकारी कोण? चर्चा सुरु


दरम्यान या घटनेबाबत आम्ही तपास करत आहोत, अशाप्रकारचं उत्तर अमळनेर पोलिसांनी दिलं आहे. तर बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करणारा शिंदे गटाचा पदाधिकारी नेमका कोण याबाबत कोणतंही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. अमळनेर पोलिसात या घटनेबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


हेही वाचा


Jalgaon Crime : अडीच लाख देऊन लगीनगाठ बांधली, चार दिवसातच नवी नवरी पळाली!