Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांचं डोकं खराब झाले आहे. त्यांच्यावर ठाण्यात उपचार करायला हवेत, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लगावला आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलेल्या आव्हानावरून गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरे यांच्या तोंडून असे बोलणे उचित नाही. त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे. 


संजय राऊतांचं डोकं फिरलंय


जळगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं ताई, माई, अक्का, असे मिशन असणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या मिशनवर जोरदार टीकास्त्र डागले. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ताई, माई, अक्का असेच मतदान आहे हे त्यांना माहीत नाही का? संजय राऊत यांचे डोके खराब झाले आहे. बाजूलाच ठाणे जिल्हा आहे. त्यांनी तिथे उपचार घ्यावेत, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला. तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना माणूस किती अनीतीमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपटी, कारस्थानी असू शकतो हा संघाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस, असे वक्तव्य केले. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, त्यांना दुसरे कामच नाही. सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्यात काहीतरी बोलणे. यात त्यांना फार मर्दानगी वाटते. त्यांनी ते कायम करत राहावे, मात्र जनता हुशार आहे, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.   


उद्धव ठाकरेंनी अशी भूमिका घेणे योग्य नाही


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मुखातून असे शब्द येणे हे मला उचित वाटत नाही. कारण हे मागील काळात सोबत काम केलेले लोक आहेत. एकमेकांच्या पक्षाविरोधात माणूस भूमिका मांडतो. पण, अशा पद्धतीने भूमिका मांडणे हे योग्य नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले. 


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा आढावा 


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब चौधरी हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्यात भाऊसाहेब चौधरी यांची जळगावसाठी निवड झाल्याने त्यांनी जळगावच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यात काय-काय केले पाहिजे, त्या पद्धतीच्या सूचना भाऊसाहेब चौधरींनी दिलेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही काम करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात आमदार कसे निवडून येतील याबाबत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. 


आणखी वाचा


संजय राऊत पात्रता ओळखून बोला, तुम्ही आणि तुमचा मालक मागच्या दाराने निवडून आलेत, गिरीश महाजनांचा हल्लाबोल