जळगाव : वर्षाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावामध्ये काल 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडली आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या आणि कारचा कट लागल्याच्या कारणातून मोठा वाद झाला आहे. यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावामध्ये दगडफेक करत जाळपोळ केली. याघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या घटनेत 12 ते 15 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेने गावात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.


स्थानिक सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने, समोर उभ्या असलेल्या गर्दीला बाजू करण्याच्या उद्देशाने हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने, काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केली, यावेळी वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीही वाहनात असल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणाना आवरण्याचा प्रयत्न केला असता, अजून काही तरुण धावून आले. त्यानंतर दोन गट आमने-सामने आल्याच्या कारणावरून, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात काही दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना नवीन वर्षाच्या प्रारंभीच घडल्याने खळबळ उडाली आहे.


दुकानांची जाळपोळच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला


 घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस बंदोबस्त वेळीच पोहोचल्याने हल्लेखोर पळून गेल्याने वेळीच शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दुकानांच्यासह चार वाहनांची जाळपोळ करणाऱ्या तरुणांचा शोध रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या कडून सुरू होता, मंत्री गुलाबराव पाटील नववर्षाच्या निमित्ताने वणीच्या  गडावर दर्शनासाठी गेलेले असताना, त्यांच्या गावात हा प्रकार घडला आहे. दुकानांची जाळपोळ जमावाने केल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे, मात्र कोणत्या कारणावरून वाद उद्भवला या बाबत तपास सुरू असल्याचं सांगत मौन बाळगले आहे. 


 गावात सध्या शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू


या घटनेची माहिती मिळताच आम्ही सर्वजण घटनास्थळी दाखल झालो काही दुकाने फोडली आहेत. सध्या गावात शांतता आहे. आमचा बोलणं चालू आहे. ज्यांनी हे सगळं केलं आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. नेमकं काय कारण आहे, त्या संदर्भात तपास सुरू आहे. गावात सध्या शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन कायदेशीर कार्य केल्यानंतर सर्व माहिती देण्यात येईल आतापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


नेमकं काय घडलं?


काल रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंब वाहनांमधून जात होतं, चालकाने, समोर उभ्या असलेल्या गर्दीला बाजू करण्याच्या उद्देशाने हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने, काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केली, यावेळी वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीही वाहनात असल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणाना आवरण्याचा प्रयत्न केला असता, अजून काही तरुण धावून आले. वाहन चालकाने हॉर्न वाजवला आणि त्याचा राग काही जणांना आला आणि त्यानंतर दोन गट आपापसात भिडले. त्यानंतर संपूर्ण घटना घडली आहे. वाहनांची आणि कारची तोडफोड करण्यात आलेली आहे. काल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस गावामध्ये दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. गावात तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे.


 कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. जशी जशी परिस्थिती निवळेल तशी संचारबंदीचा कालावधी केला जाणार आहे. आतापर्यंत वीस ते पंचवीस अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जाळपोळ करणारे नेमके कोण होते, त्याबाबतची अद्याप माहिती पोलिसांना पूर्णपणे मिळालेली नाही. दोन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे, त्यानुसार कारवाई सुरू आहे. मात्र, मंत्र्यांच्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न झालेला होता, अतिशय गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने देखील यावरती गंभीरतेने दखल घेतलेली आहे.