Girish Mahajan on Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हते. त्यावेळी भाजपला मी जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले होते. यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.  


गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये काम करत होते. हरिभाऊ जावळे (Haribhau Jawale) यांची बॅग घेऊन फिरताना मी त्यांना बघितले आहे. त्यांनी खूप दगडं खाल्ले, प्रतिकूल परिस्थितीत काम केले असं काही नाहीये. 1990 मध्ये विधानसभेचे त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडून आले या गोष्टीचा मी साक्षीदार आहे.


खडसेंचा हा स्वार्थीपणा


सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त खाते त्यांना मिळाले. कोणता वाईट काळ त्यांनी बघितला आहे. तुम्ही पक्षप्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा निवडून आले हे तुम्ही विसरू नका. खडसेंचा हा स्वार्थीपणा आहे. त्यांनी कोणाला शिकवू नये. टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.


सोयीचे राजकारण करू नका


आम्हाला कुणाच्या आशीर्वादाची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचे काम करा. तिकडे किती मतं पडतात ते दाखवा. आता तुम्ही सांगितला आहे ना की मी राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गट आहे. तर तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा दोन्ही लोकसभा मतदारसंघात दाखवा. सोयीचे राजकारण करू नका. तशी भूमिका घेवू नका. फार काळ तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले. 


आज तुम्ही कुठेच राहिला नाहीत


एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांची काय ताकद होती ते मला माहित आहे. पक्षासोबत होता म्हणून त्यांची ताकत होती पक्ष सोडला आता त्यांचं काय राहिले? त्यांच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत सुद्धा त्यांची नाही, जिल्हा बँक त्यांची नाही, जिल्हा दूध संघ त्यांच्याकडे नाही. त्यांच्या मुलीला ते त्यांच्या मतदारसंघातून निवडून आणू शकत नाही. पण माझ्यामुळे सर्व काही आहे हा समज त्यांचा आता दूर झाला असेल. भाजपमध्ये होता म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही बाजार सोडून गेला आज तुम्ही कुठेच राहिला नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 


उमेदवार बदलाबाबत कुठलीही चर्चा नाही


लोकसभेसाठी जळगाव जिल्ह्यात भाजपकडून रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र रक्षा खडसेंना भाजपकडून विरोध करण्यात येत आहे. रावेरमधील भाजपच्या 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. त्यामुळे जळगावातील उमेदवार बदलणार का? अशी चर्चा सुरु आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलाबाबत कुठलीही चर्चा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


मनसे आणि आम्ही समविचारी


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे आणि भाजप युती होणार, अशी चर्चा रंगली आहे. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, मनसे आणि आम्ही समविचारी आहोत. युती झाली तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदेंचा गट जर आमच्याबरोबर येऊ शकतात तर मनसे आणि भाजपचे विचारसरणी सुद्धा एकच आहे. होईल की नाही मला माहित नाही मात्र असं झालं तर आश्चर्य वाटायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


Raksha Khadse : रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा रावेरमधून उमेदवारी, तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी एकामागे एक दिले राजीनामे