Maharashtra Jalgaon News: लग्न म्हटलं की, अनेक गोष्टी येतात. वर पक्षाकडून विवाह सोहळ्यात ऐनवेळी पैशांसाठी अडून राहिल्याच्या अनेक घटनाही आपण नेहमी पाहतो. मात्र या मानसिकतेविरुद्ध असलेला एक अनोखा विवाह सोहळा जळगावात (Jalgaon News) पाहायला मिळाला. लग्नासाठी सासरच्यांनी वधू परिवाराला एक रुपया खर्च करु न देता त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. 


अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलाणी यांचा एकुलता एक मुलगा आशिष यांचा विवाह अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी होणार आहे. आज (शुक्रवार) 10 फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आशिष हा इंजिनियर आहे, तर सिमरन चंदानी हीसुद्धा उच्चशिक्षित असून  एका प्रसिद्ध कंपनीच्या एज्युकेशन ॲपमध्ये संचालक पदावर कार्यरत आहे. 


वधू परिवाराला एकही रुपया खर्च करु न देता सासरी येण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध


एकुलता एक मुलगा असल्याने त्याचा विवाह शाही थाटात व्हावा, असं गोकलाणी यांचं स्वप्न होतं, तसेच मुलगी नसल्याने घरात येणाऱ्या सुनेला सरजू गोकलाणी यांनी मुलगी मानलं आहे. मुलगी असती तर तिचा जसा शाहीविवाह केला असता, तसाच आनंद घरात येत असलेल्या सुनबाईलाही मिळावा यासाठी तिच्या गावावरुन लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी गोकलाणी यांनी चक्क हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. विवाहासाठी वधू परिवाराला एक रुपया खर्च करु न देता, विवाह करुन देत असताना लाखो रुपये खर्चून माहेरहून सासरी येण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करुन दिलं आहे.


हेलिकॉप्टरमधून नवरी मुलगी आणि कुटुंबीय अहमदनगरहून अमळनेरला दाखल


याबाबत गोकलाणी यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला किंवा तिच्या कुटुंबियांना अजिबात माहिती दिली नाही. कोणालाच न कळवता आज थेट सुनबाईला लग्नाच्या ठिकाणी अमळनेर येथे आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून नवरी मुलगी सिमरन आणि तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे. अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसून नवरी मुलगी सिमरन आणि तिच्या कुटुंबियांचं अमळनेर येथे आगमन झालं. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं, त्या ठिकाणी सिमरनच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर जोडपं सुरुवातीला अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेलं. या ठिकाणी त्यांनी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पृष्टी करत सर्वांचंच लक्ष वेधलं. एकुलता एक मुलगा आहे, सिमरन हिला सूनबाई समजून नव्हे तर मुलगी समजून तिचा स्वीकार करत असून त्याचाच हा मोठा आनंद साजरा करत असल्याचं गोकलाणी यांनी बोलताना सांगितलं.


शाही विवाहसोहळ्याची जिल्हाभर चर्चा


लग्न हे अनोख्या पद्धतीने व्हावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र चक्क हेलिकॉप्टरमधून लग्नाच्या ठिकाणी पोहोचेन, हेलिकॉप्टरमधून प्रवासाची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते, या शब्दांत सिमरन हिने बोलताना तिचा आनंद व्यक्त केला. नवरी मुलगी ही लग्नाच्या ठिकाणी चक्क हेलिकॉप्टरमधून आल्याने तसेच अत्यंत शाही पद्धतीने पार पडणाऱ्या या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.