जळगाव : मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. भोसरीत भूखंड खरेदी करताना एकनाथ खडसेंनी गैरव्यवहार केल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला होता. तर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना ओपन चॅलेंज दिलं होतं. 'मला पाडायचा असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा', असे त्यांनी म्हटले होते. आता यानंतर एकनाथ खडसे गिरीश महाजनांवर चांगलेच संतापले आहेत. 


एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हा माणूस नुसती बडबड करणारा आहे. देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला माणूस गिरीश महाजन आहे. गिरीश महाजनांचे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. त्यामुळे त्यांना भाव देण्यासारखं महत्त्व नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 


गिरीश महाजनांची माहिती चुकीची


गिरीश महाजन यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यात बोलताना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर केला. यावरून एकनाथ खडसे म्हणाले की, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्या गेलं होतं. त्याचा प्रमुख सूत्रधार कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणतात की, भोसरीत खडसेंनी भूखंड घेतला. आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचं नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री असताना तेवढी अक्कल मला होती. गिरीश महाजनांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची दिली आहे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला. 


तुम्ही पाटबंधारे मंत्री होता तेव्हा काय दिवे लावले? 


ते पुढे म्हणाले की, तुम्ही म्हणता माझ्या बायकोला हरवले. तुम्ही गद्दारी करून हरवले आहे. बोदवड आणि मुक्ताईनगरनगर पंचायत ही माझी होती. परंतु, तुम्ही फोडाफोडीचे राजकारण केले. पैशांचे आमिष देऊन त्या संस्था ताब्यात घेतल्या. आमच्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत एक सुद्धा माणूस तुमचा निवडून आला नाही. मी काय काम केले असे प्रश्न ते विचारतात. तर जे धरणाचे काम उभे केले ते मी केले आहे. तुमच्या मतदारसंघातले धरण 100 टक्के नाथाभाऊंच्या कालखंडात झाले आहे. तुम्ही पाटबंधारे मंत्री होता तेव्हा काय दिवे लावले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आमची जामनेरची सभा तुम्ही पाहिली. त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्या उलट तुम्ही माझी नार्को टेस्ट संदर्भात बोलतात. त्याची काय गरज आहे? असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली