Eknath Khadse जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात 1 रुपयाचा एक रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. माझ्याजवळ एकनाथ खडसेंची किंमत ही केवळ एक रुपायची आहे, अशी टीका खडसे यांनी महाजनांवर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी खडसे म्हणाले की, महाजन यांनी खोटे विधान करून छळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजात माझी बदनामी झाली, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा न्यायालयात महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच एक रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
समाजात माझी बदनामी झाली
महाजन यांनी माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी संशयास्पद वक्तव्य केले होते. तसेच माझ्या आजाराविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केले होते. यामुळे समाजात माझी बदनामी झाली आहे. महाजन यांच्याविरुद्ध कोर्टात दाद मागितली आहे, असे खडसे म्हणाले. ॲड हारुल देवरे, ॲड. अतुल सूर्यवंशी यांच्या माध्यमातून खडसे यांनी दावा तसेच फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले होते गिरीश महाजन?
मला दोन मुली असून मी त्यांना राजकारणात आणलेलं नाही. मला त्याचा आनंद आहे. पण माझा खडसेंना प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता. त्याचे काय झाले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचे भलं आहे.
एकनाथ खडसे आजकाल काय बोलताय त्याचे त्यांना भान राहत नाही. ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत. कधी मला चावट म्हणताहेत, तर कधी बदनामी करा म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणे स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा यात सबळ पुरावे मिळत आहेत म्हणून ते अस्वस्थ झाले आहेत, असेदेखील गिरीश महाजन याआधी बोलले होते.
गिरीश महाजन काय उत्तर देणार?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे कलगीतुरे आता थेट कोर्टात पोहचल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद काही नवीन नाही. आता या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन आता यावर काय पलटवार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आणखी वाचा