मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 1999 पासून शिवसेनेकडून घटनादुरुस्ती सादर केली नसल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच नार्वेकरांकडून देण्यात आलेल्या निकालाची चिरफाड आज ठाकरे गटाकडून करण्यात आली. यावेळी जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीला राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी थेट 2013 मधील ठराव आणि नार्वेकर उपस्थित असलेला व्हिडिओ सुद्धा यावेळी दाखवला.तसेच 2013 मध्ये शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक आणि कार्यकारिणीचे ठराव वाचून दाखवले.  


अनिल परब काय म्हणाले? 


परब यांनी महा पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्यावेळी राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधिमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही, तर मूळ राजकीय पक्ष त्यांची घटना, त्यांची संघटनात्मक रचना आणि इतर चाचण्या देखील घेणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून मग जर घटना बघायची असेल तर त्या घटनेमध्ये पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत? पक्षाच्या नेत्याला काय अधिकार आहेत? घटनेचं नीट पालन झालं आहे की नाही? पाच पाच वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत की नाही? हे तपासून घेण्याची गरज होती. 


त्यांनी (राहुल नार्वेकर) असं सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे की 1999 नंतर आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नाही आणि रेकॉर्डवर काही नसल्यामुळे आम्ही असा निर्णय देतो की 1999 ची जी घटना आहे ही तुमची शेवटची आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही नाही आणि त्या 1999 च्या घटनेत सर्वोच्च अधिकार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते. त्याच्यानंतरचे अधिकार कोणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही आणि आता बाळासाहेब नसल्यामुळे आम्हाला विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे असं समजून चिन्ह काढून घेतलं. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती साधारण राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालात केली आहे. 


अनिल परब यांनी ठराव दाखवले


परब म्हणाले की, 23 जानेवारी 2013 ला वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती. 2013 च्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये आम्ही पक्ष घटनादुरुस्तीचे ठराव मांडले होते. 23 जानेवारी 2013 च्या राष्ट्र कार्यकारणीमध्ये पक्ष घटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले. 


काय होते 2013 मधील ठराव?



  • शिवसेनाप्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते, म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेनाप्रमुखी संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख संज्ञा गोठवण्यात येत आहे 

  • शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल, शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत पाच वर्षासाठी असेल

  • शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे 

  • आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत. 

  • शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील 

  • पक्ष घटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील. पक्ष घटनेच्या अकराव्या कलमानुसार पक्ष संदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रक्षप्रमुखांकडे असतील. 

  • शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या 31 असेल त्यापैकी 21 जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित दहा जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील. 

  • शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशातील कार्यरत असतील. युवासेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे. युवासेना व युवासेना प्रमुख यांचा पक्ष घटनेच्या बाराव्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या