जळगाव : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या याच उपोषणामुळे सरकार अडचणीत सापडले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जरांगे यांच्या उपोषणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगेसारख्या सामान्य माणसाच्या मागे करोडो लोकं हे सरकारचं फेल्यूअर असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. 


दरम्यान यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, जरांगेसारख्या सामान्य माणसाच्या मागे करोडो लोकं उभे आहेत. म्हणजेच सरकारचं हे फेल्यूअर आहे. त्यामुळे हा सरकारच्या विरोधातील उद्रेक आहे. तर मराठा आरक्षणाचे सरकारमध्ये असलेल्या लोकांनी आणि भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. 


मोदींवर टीका...


दरम्यान, शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न शिर्डी येथील सभेत विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील पटोले यांनी टीका केली आहे. 'मागील 10 वर्षात तुम्ही काय केले याचा हिशोब मोदी यांनी जनतेला दिला पाहिजे, म्हणजेच बरोबर होईल. आपला हिशोब द्यायचा नाही, जुने मुर्दे खोदायचे आणि खोट्या पद्धतीने बोलायचे देशाच्या पंतप्रधान यांना शोभत नाही,असेही नाना पटोले म्हणाले. 


भाजपाच्या सत्ताकाळात गरीबांची सर्वाधिक पिळवणूक 


जळगावच्या बोदवड येथील सभेतून पटोले यांनी कार्यकर्त्यान मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे सामाजिक आणि आर्थिक उत्थान होणे गरजेचे आहे. भाजपाच्या सत्ताकाळात गरीबांची सर्वाधिक पिळवणूक झाली. त्यांचे सर्वाधिक शोषण देखील झाले आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना भाजपाच्या शासनकाळात कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन उत्पादकांच्या हातात तर अक्षरशः उत्पादनखर्च देखील येत नाही. केंद्र सरकारच्या गेल्या दोन वर्षांपासून तेल आयात करण्याच्या धोरणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. काँग्रेस सोयाबीन उत्पादकांचे अश्रू पुसण्यासाठी मैदानात उभी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करीत असल्याचं," पटोले म्हणाले.


काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली...


बोदवड शहरात काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंवाद यात्रेत नाना पटोले सहभागी झाले होते. याप्रसंगी शेतकऱ्यांना जिव्हाळ्याचा असणारा ट्रॅक्टर रॅलीत सहभागी करुन घेण्यात आला होता. या ट्रॅक्टरचे सारथ्य करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून प्रवास केला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार, उपाध्यक्ष मा‌.खासदार उल्हासदादा पाटील, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव शहराध्यक्ष शामकांत तायडे आणि इतर मान्यवर आदी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nana Patole : आण्णा हजारेंना आंदोलन करण्यापासून थांबवलं, पण आता महाजनांच्या मध्यस्तीनंतर आंदोलनं अधिक पेटली: नाना पटोले