Chandrakant Patil on Eknath Khadse : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यावरून आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. तसेच रक्षा खडसेंवर (Raksha Khadse) देखील चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राज्याचे आणि देशाचे नेते आहे. तो आमचा अमूल्य ठेवा आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने आमच्या छातीत धडकी भरली आहे. सरकारने त्यांना लवकरात लवकर झेड सिक्युरिटी द्यायला पाहिजे. त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. डी गँग आणि छोटा शकील गँगकडे सध्या काही कामं नसल्याने आणि ते बेरोजगार झाले असल्याने, अशा धमक्या ते देत असावेत, असा टोमणा त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.
सुरक्षा मिळण्यासाठीच एकनाथ खडसेंची धडपड
खडसे यांचे दुर्दैव असे आहे की, ते सत्तेत येताच त्यांना धमक्या येतात. विरोधात असताना त्या येत नाही. याचे कोडे आपल्याला समजत नाही. खऱ्या अर्थाने त्यांना धमकी आली असेल तर सरकारने लवकरात लवकर त्यांना सुरक्षा पुरवावी. कारण सुरक्षा मिळण्यासाठीच ही धडपड असावी. त्यामुळे सरकारने त्यांना लवकरात लवकर सुरक्षा यंत्रणा द्यावी, अशी आपली सरकारला विनंती असल्याची खोचक टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर दिली आहे.
प्रांत आणि इतर अधिकाऱ्यांवर किती दबाव असेल?
अवैध गौण खनिज केल्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावरील एसआयटीच्या (SIT) स्थगिती विरोधात चंद्रकांत पाटलांनी न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची 30 एप्रिल रोजी सुनावणी आहे. त्यावर अधिक बोलणे उचित होणार नाही. मात्र या जमिनीवर बेकायदा बोजे उतरविण्यात आले आहे. त्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत. कोणतेही कारण नसताना या प्रकरणाला बेकायदा स्थगिती दिली आहे. एखाद्या सामान्य नागरिकाला वेगळा न्याय दिला जातो. मात्र यांना वेगळा न्याय दिला जात आहे. प्रांत आणि इतर अधिकाऱ्यांवर किती दबाव असेल? हे त्यांनी केलेल्या बेकायदा कारवाईमधून बघायला मिळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
रक्षा खडसेंना गरज वाटली तर...
सध्या लगीन सराई आहे आणि रावेरची सीट पक्की आहे. फक्त किती लीड वाढवायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या आमच्या सारख्याची गरज नाही आणि गरज वाटली तर शेवटच्या क्षणी आम्ही मदतीसाठी उतरणार आहोत. त्यांच्याकडून आपल्याला रोज बोलवण्यात येते. रोज त्यांची माणसे आपल्याला घ्यायला येत असतात, अशा प्रकारची उपरोधिक टीका चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यावर केली आहे.
आणखी वाचा