Aaditya Thackeray on Rahul Narwekar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे. शिवाय, अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांतील आमदार पात्र आहेत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला आता त्यांचा पक्षाशी काही संबंध राहिला नाही. मात्र ज्यांनी पक्ष पळवला ,त्यांच्या मालकीचा पक्ष करण्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते जळगाव येथे बोलत होते. 


काय म्हणाले आदित्य ठाकरे? 


राहुल नार्वेकरांच्या निर्णयाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीचा निकाल अपेक्षित होता अगदी तसाच निर्णय अध्यक्षांनी दिला आहे. आपल्या वेळेला सुद्धा त्यांनी असाच निर्णय दिलाय. शिवसेनेबाबत जो घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसाच घोळ राष्ट्रवादीबाबत केला गेला आहे. अध्यक्ष ट्रायबल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात हे धक्कादायक आहे. आपल्या देशात लोकशाही नाही आहे हे जगात सांगायला आता काही हरकत नाही, असा उपरोधित टोलाही ठाकरेंनी लगावला. 


महाराष्ट्र याला उत्तर देईल


महाराष्ट्राची जशी लूट केली जात आहे,तसे पक्ष पण लुटले जात आहेत. शरद पवार हे जिद्दीने लढत आहेत त्यांनी शून्यातून सर्व घडवलं व राष्ट्रवादी उभी केली त्यानंतर असं होणं चुकीचं आहे. शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी आपले पक्ष वाढवले आणि दोघांसोबत जे घडलंय त्याला महाराष्ट्रात उत्तर देईल, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले. 


महाराष्ट्राच्या पदरी काय पडतय?


2022 मध्ये शिवसेना 2023 मध्ये राष्ट्रवादी 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे. एवढे सर्व करुन पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडतय? महाराष्ट्रासाठी सरकारने काय केले? नुसते आकडे वाढवायचे आणि एवढे सर्व बहुमत करुन पण आकडे तर दिसत नाहीत. एवढे सर्व पक्ष फोडून पण  चारशे पार होत नाहीत मग निवडणुकीत चारशे पार कसे करणार? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी  संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. हिंदूह्रदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडण्याचे पाप विधानसभा अध्यक्षांनी केलं तेच पाप राष्ट्रवादी काँग्रेस ज्या शरद पवारांनी घडवली ते फोडण्याचे पाप आज केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


NCP Crisis: शरद पवार गटाने १० व्या परिशिष्टाचा गैरवापर करु नये, आमदारांना धमकावू नका; विधानसभा अध्यक्षांनी खडसावले