मुंबई: राज्यघटनेतील दहावे परिशिष्ट हे म्हणजे पक्ष चालवण्यासाठीचे शस्त्र नाही. शरद पवार गटाने १० व्या सूचीचा गैरवापर करु नये. आमदारांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करु नये, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाला खडसावले. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणात १० वे परिशिष्ट लागू होत नाही, असे सांगत शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या डोक्यावरील अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली आहे.


यावेळी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हे ठरवताना विधिमंडळातील बहुमत हा निकष ग्राह्य धरला. पक्षाची घटना आणि नेतृत्त्वाची रचना हे दोन निकष ग्राह्य धरता येणार नाहीत, नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आपले निरीक्षण नोंदवताना म्हटले की, नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही.  अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे याप्रकरणात दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येत नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही. विधानसभा अध्यक्षांचा खरंतर या सर्व घटनांशी काहीही संबंध नसतो. तो कायद्याचा पालक असतो. पक्षातंर्गत वाद हे त्या त्या पक्षानं आपापसात मिटवायला हवेत, असा सल्लाही यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना दिला.


दोन्ही गटाचे आमदार पात्र


यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाबाबत निकाल देताना एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज घडली. आजदेखील विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटाचे आमदार पात्रच असल्याचा निकाल दिला.


 


आणखी वाचा


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा


राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकषच ग्राह्य धरता येईल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य