मुंबई : जवळजवळ प्रत्येकालाच माझ्याकडे आयफोन असावा असं वाटतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण कित्येक वर्षे खटाटोप करतात. काही तरुण मंडळी तर काम करून पैसे जमा करून आवडीचा आयफोन घेतात. आयफोन घेण्यासाठी हौशी लोक लाखो रुपये मोजण्यासाठी तयार असतात. मात्र, बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, लाखो रुपये खर्च करून आयफोन घेणं म्हणजे पैशांची माती करण्यासारखंच आहे. आयफोनचे हेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. हा फायदा नेमका कसा होऊ शकतो? ते जाणून घेऊ या....
1 लाख 19 हजार 900 रुपयांचा आयफोन
सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या पैशांवर चांगले रिटर्न्स मिळवू शकता. आयफोन खरेदीसाठीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास तुमच्या पैशांचे मूल्य कसे वाढू शकते, हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. या उदाहरणासाठी तुम्ही आयफोन 16 प्रो ( iPhone 16 Pro) हा फोन घेण्याचा विचार करत आहात, असं गृहित धरुया. तुम्ही एकरमकी 1 लाख 19 हजार 900 रुपये देऊन हा फोन खरेदी केला तर लगेच तुम्हाला हा फोन दिला जाईल.
पावणे दोन लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात रिटर्न्स
मात्र पुढच्या पाच वर्षांत या आयफोनचे मूल्य साधारण 70 ते 80 हजारांच्या आसपास होऊ शकते. काळानुसार या आयफोनचे मूल्य कमी होणार. म्हणजेच तुम्ही तब्बल 1 लाख 19 हजार 900 रुपयांचे मूल्य पाच वर्षांनी काही हजारांपर्यंत कमी होईल. मात्र हेच पैसे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्या पैशांचे मूल्य पावणे दोन लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.
तुम्हाला पावणे दोन लाख रुपये कसे मिळतील?
तुमच्या याच 1 लाख 19 हजार 900 रुपयांचे मूल्य भविष्यात वाढू शकते. सध्या तुम्ही आयफोन घेण्याऐवजी एखादा 20 हजार रुपयांपर्यंतचा फोन घेतल्यास ते शक्य आहे. हा 20000 रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला, तर तुमच्याकडे आयफोनसाठी ठेवून दिलेले साधारण एक लाख रुपये शिल्लक राहतात. हेच एक लाख रुपये एकगठ्ठा तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवल्यास तुमचे पैसे वाढू शकतात.
हा आहे जादुई फॉर्म्यूला
एसआयपीवर साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरले जाते. तुमच्याकडे असलेल्या एक लाख रुपयांची एसआयपी पाच वर्षांसाठी केली तर तुम्हाला 12 टक्क्यांप्रमाणे रिटर्न्स मिळू शकतील. 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले असे गृहित धरले तर तुम्ही केलेल्या एसआयपीत गुंतवलेल्या एक लाख रुपयांवर पाच वर्षांत एकूण 76,234 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला पाच वर्षांत एकूण 1 लाख 76 हजार 234 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही आयफोनमध्ये गुंतवणूक करून तुमच्या पैशांचे अवमूल्यन करून घेण्यापेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणूक करून हजारो रुपये कमवू शकता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
GMP शून्यावर पण तब्बल पावणे दोन पट सबस्क्रीप्शन, निवा बुपाच्या IPO चं रॉकेट सुस्साट!
नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?