बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यातील प्रशांत साहू यांचं 12 एकरावरील कापसाचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. हताश झालेल्या साहूंनी आपल्या शेतात जनावरांना सोडलं आहे. हाताशी आलेलं पीक बोंडअळीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हताश झालेल्या साहूंनी आपलं कापसाचं पीक शेतकऱ्यांना किमान चारा मिळावा म्हणून जनावरांच्या हवाली केलं आहे.
अकोला जिल्ह्यातील गजानन बोंडेंची समस्याही काही वेगळी नाही. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावानं गजानन बोंडेंनी आपल्या 7 एकरातील कपाशीवर नांगर फिरवला आहे. बोंडेंनी आपल्या कपाशीवर आतापर्यंत जवळपास अडीच लाख रुपये खर्च केले होते. मात्र बोंडअळीमुळे हातातोंडाशी आलेल्या पीकावर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. अंगावर असलेलं पाच लाखांचं कर्ज कसं फेडावं हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. हेच चित्र विदर्भात सगळीकडेच पाहायला मिळतं आहे.
काय आहे आकडेवारी ?
- महाराष्ट्रातील कापूस लागवड -64 लाख हेक्टरपेक्षा जास्त
- सरासरीच्या112 टक्के
- गुलाबी बोण्डअळीआक्रमण - शासकीय आकडे उपलब्ध नाहीत
- शासनाच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन - 90% कापसावर प्रादुर्भाव
जवळपास 15 वर्षांपूर्वी आलेल्या बीटी कपाशीमुळे शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळत होतं. मात्र आता 2009 पासून बीटीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरु झाल्या.
विदर्भात शेतकऱ्यांसाठी कापूस म्हणजे पांढरं सोनं मानलं जातं. मात्र तेच सोनं आता मातीमोलाचे ठरले आहे. या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे रिपोर्ट जरी कृषी खात्याने मागवले असले, तरी गेल्या 5 वर्षात वापरात सुरु झालेली बीटी 2 टेक्नॉलॉजी ही नक्कीच यावेळी तरी अनुत्तीर्ण झाली आहे.