INDvsAUS | टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 287 धावांचं लक्ष्य, स्टीव्ह स्मिथचं शतक तर शमीच्या चार विकेट्स
एबीपी माझा, वेब टीम | 19 Jan 2020 05:41 PM (IST)
आज भारत विरुद्ध ऑस्ट्रलियामध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकणे मालिका विजयासाठी आवश्यक आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 287 धावांचं लक्ष्य आहे.
बंगळुरु : बंगळुरुतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला मालिका विजयासाठी 287 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या शानदार खेळीने 286 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक हुकलेल्या स्मिथने या सामन्यात शानदार शतक झळकवले. त्याला मार्नस लाबुशेनने 54 धावा करत चांगली साथ दिली. तर अलेक्स कॅरीने 35 धावा केल्या. या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात 286 धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय चुकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारुंच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र स्मिथ आणि लाबुशेनच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे कांगारुंना सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. पहिल्या सामन्यात शानदार शतक ठोकणाऱ्या सलग दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर लवकर माघारी धाडले. यापाठोपाठ कर्णधार फिंचही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. यानंतर लाबुशेन आणि स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. ही जोडी कांगारुंना मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच जाडेजाने लाबुशेनला 54 धावांवर आऊट केले. यानंतर स्मिथने यष्टीरक्षक कॅरीला सोबतीला घेत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. यादरम्यान स्मिथने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने 131 धावांची खेळी केली. अखेरीस तळातल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत कांगारुंना 286 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आणलं. भारताकडून मोहम्मद शमीने चार, रविंद्र जाडेजाने दोन तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. संबंधित बातम्या IND vs AUS 3rd ODI : बंगळुरुत कोणाचं पारडं जड? काय आहे दोन्ही संघांची आकडेवारी? माजी क्रिकेटर बापू नाडकर्णींचं निधन, सचिन आणि गावस्करांकडून आदरांजली