मुंबई : भारताचे माजी कसोटीवीर रमेशचंद्र उर्फ बापू नाडकर्णी यांचं काल संध्याकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या अनुराधा आणि जावई विजय खरे असा परिवार आहे. अचूक टप्पा आणि अचूक दिशा राखणारा डावखुरा फिरकी गोलंदाज अशी बापूंची एका जमान्यात ख्याती होती.
नाडकर्णी यांनी कारकीर्दीतल्या 41 कसोटी सामन्यांत 1411 धावा आणि 88 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती. 43 धावांमध्ये 6 विकेट्स ही त्यांची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी होती. बापूंनी प्रथम दर्जाच्या 191 सामन्यांमध्ये 8 हजार 880 धावा आणि 500 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर यांनी बापूंना आदरांजली वाहिली आहे.
सलग 21 निर्धाव षटकं टाकण्याच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भारताचा कसोटीमधील सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. चेन्नईमधील एका सामन्यात त्यांनी 32 षटकांपैकी 27 षटकं निर्धाव टाकली होती. 32 षटकात त्यांनी अवघ्या 5 धावा दिल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्ध कानपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात बापूंनी 34 षटकं गोलंदाजी केली होती. त्यापैकी 24 षटकं त्यांनी निर्धाव टाकली होती. त्यात त्यांनी अवघ्या 23 धावा दिल्या होत्या. त्याच मालिकेत दिल्लीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी 34 षटकात 24 धावा देत एक बळी मिळवला होता. या डावातही त्यांनी तब्बल 24 षटकं निर्धाव टाकली होती.
बापूंच्या निधनाची बातमी कळताच सचिन तेंडुलकरने एक ट्वीट करत त्यांना आदरांजली वाहिली. सचिनने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बापू नाडकर्णी यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.