PRO RIDER 1000 Youtuber Agastya Chauhan Accident Death: अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर बुधवारी हृदयद्रावक अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातात उत्तराखंडचा यूट्यूबर अगस्त्य चौहान याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अगस्त्य चौहान (25) हा त्याच्या स्पोर्ट्स बाईकवरून आग्र्याहून दिल्लीला येत होता. दरम्यान, यमुना द्रुतगती मार्गावर 47 मैलांवर त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि तो दुभाजकावर आदळला. या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार, युट्युबर अगस्त्य चौहान यमुना एक्सप्रेसवेवर 300 च्या वेगानं बाईक चालवत असताना व्हिडीओ शूट करत होता. दरम्यान, त्याचं रेसिंग बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि बाईक दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, अगस्त्य चौहान याच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अगस्त्य चौहानवा खूप रक्तस्त्राव झाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी अगस्त्य चौहान अलीगडहून दिल्लीला जात होता. ठाणा टप्पल भागातील यमुना एक्सप्रेस वेच्या 47 मैलांवर हा अपघात झाला.


अगस्त्य चौहान हा मूळचा डेहराडून, उत्तराखंडचा. त्याच्या YouTube चॅनेलचं नाव PRO RIDER 1000 आहे. या चॅनलचे 12 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. अगस्त्य चौहान यानं मृत्यूच्या अवघ्या 16 तास आधी शेवटचा व्हिडीओ अपलोड केला होता. ज्यामध्ये तो मित्रांसोबत लवकरच दिल्लीला पोहोचणार असल्याचं लिहिलं होतं. दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेसाठी अगस्त्य चौहान रवाना झाला होता. त्यानं त्याची ZX कावासाकी बाईकसुद्धा बदलून घेतली. बाईक चालवतानाही अगस्त्य चौहान युट्यूब चॅनलसाठी व्हिडीओ शूट करायचा. मात्र, त्यानं त्याच्या व्हिडीओमध्ये डिस्क्लेमरही टाकला होता, तसेच वेगानं दुचाकी न चालवण्याचा इशाराही त्याच्या सबस्क्रायबर्सना दिला होता.


बुधवारी आग्र्याहून दिल्लीला येत असताना अगस्त्यनं यमुना एक्स्प्रेस वेवर दुचाकी 270 च्या वेगानं घेतली. तो त्याच्या दुचाकीला अगस्त्य घोडा म्हणायचा. तर अगस्त्य जीपीएसद्वारे दिल्लीला जात होता. अगस्त्य 300 च्या वेगानं गाडी चालवण्यासाठी रिकामा हायवे शोधत होता. 300 च्या वेगानं बाईक चालवण्याचा प्रयत्न केला असता त्याला त्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यानं स्वत: व्हिडीओमध्ये सांगितलं की, त्यानं यापूर्वी कधीही 300k स्पीडनं बाईक चालवली नाही, परंतु यावेळी ते करण्याचा प्रयत्न करेल. मात्र यादरम्यान त्याची दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. या अपघातात अगस्त्य चौहान याचा जागीच मृत्यू झाला.