तिरुवनंतपुरमः केरळच्या आर्या राजेंद्रनने केवळ 21 व्या वर्षी महापौर बनत देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय. ती बीएस्सी मॅथेमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिचे वडील इलेक्टिशियनचे काम करतात. आर्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (CPIM) सदस्या आहे. आर्याला तिच्या पक्षाने तिरुवनंतपुरमच्या सिटी कॉर्पोरेशनच्या प्रमुखाच्या रुपात नामांकित केलंय. सीपीआयएम या तिरुवनंतपुरम महापालिका निवडणुकीत 100 पैकी 51 जागा जिंकल्या आहेत.
आर्याने मुदवनमुकल वार्डामधून निवडणूक जिकंली आहे. ती सध्या ऑल वुमेन ऑल सेंट्स महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आर्याला राजकारणाची आवड असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. आर्याची आई एलआयसी एजंट असून भाऊ अरविंदने ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पूर्ण केलंय आणि तो सध्या मध्य आशियात नोकरीला आहे.
पाचवीत असल्यापासून पक्षाची सदस्य
आर्या राजेंद्रन ही पाचवीत शिकत असल्यापासून CPIM पक्षाची सदस्य आहे. तिने पक्षाच्या बालसंगम विंगसाठी काम केलंय. नंतरच्या काळात बालसंगमची जिल्हा अध्यक्षा आणि राज्याची प्रमुख या पदावरही तिने काम केलंय. आर्याने सांगितले की बालसंगममधील कामाच्या आधारे तिला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (सीपीएम स्टुडंट विंग) च्या राज्य समितीत स्थान मिळालं.
महापौरपदाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव
महापौरपदासाठी सीपीएमने आर्याच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता औपचारिक घोषणा बाकी आहे. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. या निवडणुकीत सीपीएमने ज्या दोन महिलांना महापौरपदासाठी प्रोजेक्ट केलं होतं त्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याने आर्याच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.
आर्याने वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की राजकारणासोबतच आपले शिक्षणही ती पूर्ण करणार आहे. तसेच तिरुवनंतपुरमच्या विकासासाठी एक प्लान तयार करणार असल्याचंही तिनं सांगितलं.
संबंधित बातम्या: