तिरुअनंतपुरम: केरळमधील नववीच्या वर्गात शिकणारी मुलगी देविकाने गायलेल्या हिमाचली गीताची प्रशंसा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यांनी मळ्यालम भाषेतून केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "देविका, तुझा अभिमान वाटतो! तिच्या मधुर आवाजातील या गीताने 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही संकल्पना अधिक मजबुत होते."
'एक भारत श्रेष्ठ भारत' या कार्यक्रमाअंतर्गत केरळच्या तिरुअनंतपुरम येथे केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या देविकाने 'चंबा कितनी दूर' हे हिमाचली लोकगीत गायले होते. तिच्या शिक्षकांनी तिचा हा व्हिडिओ शाळेच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आणि क्षणार्धातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. तिने गायलेला मधुर आवाजातील हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. केरळचे सांस्कृतीक मंत्री ए.के.बालन यांनीही टेलिफोनवरून देविकाला शुभेच्छा दिल्या.
त्याआधी एक दिवस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनीही त्यांच्या फेसबुक पेजवर देविकाचा हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी म्हंटले होते की देविकाच्या या गाण्याने सगळ्या राज्याचे ह्रदय जिंकलंय. त्यांनी तिला हिमाचल प्रदेशला येण्याचे निमंत्रणही दिलंय.
'एक भारत श्रेष्ठ भारत' हा कार्यक्रम देशातील वेगवेगळ्या राज्यांत सांस्कृतिक एकता निर्माण होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केला आहे.
पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकामुळे भारावलेल्या देविकाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "हे अविश्वसनीय आहे. ज्यावेळी मी हे गाणे गायले होते त्यावेळी मला वाटले नव्हते की हा व्हिडिओ इतका लोकप्रिय होईल आणि स्वत: पंतप्रधान त्याचे कौतुक करतील. यासाठी मी माझ्या शिक्षकांचे आभार मानते. त्यांनी मला संगीत शिकवले आणि गाण्यास प्रोत्साहन दिले. मला भविष्यात डॉक्टर तसेच प्ले बॅक सिंगर व्हायचं आहे."