मुंबई : तुम्ही रोजच्या आहात मीठ खाता की प्लॅस्टिक? हे विचारण्याचं कारण म्हणजे तुमच्या मिठात प्लॅस्टिक असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. हा नुसता दावाच नाही, तर त्यावर संशोधनही करण्यात आलं आहे.


क्या आपके प्लॅस्टिक मे नमक है? ही जाहिरात वाटत असली तरी एक धक्कादायक वास्तव आहे. कारण तुमच्या जेवणात, ताटात पडणाऱ्या मिठामध्ये चक्क प्लॅस्टिकचे कण असल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय, वर्षाला तुमच्या पोटामध्ये 0.117 मिलीग्रॅम प्लॅस्टिक जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयआयटी मुंबईतल्या सेंटर फॉर एन्व्हायरमेन्टल सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातल्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं असून त्यात 8 विविध कंपन्यांच्या मिठांच्या नमुन्यात एक किलो मिठामध्ये प्लॅस्टिकचे तब्बल 626 कण आढळले आहेत.

जून आणि सप्टेंबर 2017 मध्ये 8 वेगवेगळ्या कंपन्यांचं मीठ एकत्र करण्यात आलं. या मिठाचं उत्पादन 2016 आणि 2017 या वर्षात झालं आहे. प्रयोगशाळेत 80 टक्के नमुन्यांमध्ये मिठाचे सूक्ष्म कण आढळले. त्यातल्या प्लॅस्टिकच्या कणांचा आकार हा 0.5 मिलीमीटर होता, तर तंतूचा आकार 2 मिलीमीटर इतका जाड होता. काही तंतू तर 5 मिलीमीटर इतके जाड होते

मीठ हे समुद्राच्या खाऱ्या पाण्याद्वारे तयार केलं जातं. त्यामुळे समुद्रात टाकलेल्या प्लॅस्टिकचे अंश या पाण्याद्वारे थेट तुमच्या मिठात येत आहेत. म्हणजेच मीठ कयार करताना किंवा कारखान्यामध्ये यात प्लॅस्टिक मिसळलेलं नाही.

फक्त भारतातच नाही, तर चीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, तुर्की, फ्रान्स या देशांनाही मिठातल्या प्लॅस्टिकचा सामना करावा लागत आहे.

तुम्ही जे समुद्राला अर्पण करता... तेच समुद्र तुम्हाला साभार परत करतो... त्यामुळे मंडळी... खाल्ल्या मिठाला जागा... पर्यावरणाचा आदर करा...  अन्यथा अख्खं आयुष्यच प्लॅस्टिकचं होऊ जाईल.