लखनऊ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने भाजपच्या अजेंड्यावरील अयोध्येच्या विषयाला नेहमीच प्राथमिकता दिलेली आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी श्रीरामांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शरयू तिरी हजारो दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणीच योगी सरकार श्रीरामांची 100 फूट भव्य मूर्तीची उभारण्याच्या तयारीत आहे.
शरयू तिरी उभारण्यात येणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीबद्दल राज्यपाल राम नाईक यांनाही याची कल्पना दिली आहे. या उपक्रमासाठी सरकारने जागा आणि बजेटही निश्चित केले असून, यावर एनजीटीची परवानगी लवकरच घेण्यात येणार आहे.
पर्यटना विभागाचे प्रमुख सचिव अवनीश अवस्थी यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्रस्ताव विचाराधीन असून, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पण सरकारची या ठिकाणी एक भव्य मूर्ती उभारण्याची इच्छा आहे."
योगी सरकारने या नव्या योजनेला 'अयोध्या' असं नाव दिलं असून, या योजनेअंतर्गत प्रभू श्रीरामांनी जलसमाधी घेतलेल्या गुप्तार घाटाचाही कायापालट करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी रामकथा गॅलरी तयार करण्याचाही प्रस्ताव आहे.
प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास भोगल्यानंतर आयोध्येत आगमन झालं होतं. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा 14 वर्षाचा वनवास संपला असून, भाजप सत्तेत आला आहे. त्यामुळेच हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आयोध्येत दिवाळी साजरी करणार आहेत.
यानिमित्त सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: सहभागी होणार आहेत.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून आत्तापर्यंत दोनवेळा अयोध्येचा दौरा केला आहे. तसेच, त्यांनी यावेळी रामलालांचं दर्शनही घेतलं होतं. आता राम नामाच्या आधारे पुन्हा राजकारणाला नवी दिशा दिली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
योगी सरकार शरयू तिरी 100 फुटी श्रीरामाची भव्य मूर्ती उभारणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2017 03:19 PM (IST)
योगी सरकार शरयू तिरी श्रीरामांची 100 फूट भव्य मूर्तीची उभारण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमाबद्दल राज्यपाल राम नाईक यांनाही याची कल्पना दिली आहे. या उपक्रमासाठी सरकारने जागा आणि बजेटही निश्चित केले असून, यावर एनजीटीची परवानगी लवकरच घेण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -