बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. "जर 2019 मध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान बनू शकतो," असं राहुल गांधी म्हणाले.


"तसंच 2019 मध्ये भाजपचं सरकार येणार नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानही बनणार नाही," असंही ते म्हणाले. "तुम्ही माझ्या वक्तव्यावर हसाल, पण 2019मध्ये भाजप सरकार स्थापन करणार नाही. आज विरोधकांमध्ये एकी आहे, त्यामुळेच भाजपला 2019 ची निवडणूक कठीण जाईल," असं राहुल गांधींनी सांगितलं.

2019 मध्ये मी पंतप्रधान बनू शकतो!
"तुम्ही पंतप्रधान बनणार का, असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, जर काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर का नाही बनणार? 2019 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान बनू शकतो," असं ते म्हणाले.

भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत
"जेव्हा विचारधारेची लढाई असते, तेव्हा सगळ्यांना एकत्र यायला हवं. जर तीन पक्ष एकत्र आले तर भाजपला पाच जागाही मिळणार नाहीत. जिथे भाजप आणि काँग्रेसची थेट लढत होईल, तिथेच प्रमुख राजकीय लढाई असेल," असं राहुल गांधींनी सांगितलं.

"तुम्ही बघालच 2019 मध्ये माझं राजकीय विश्लेषण खरं सिद्ध होईल आणि मोदी पंतप्रधान बनणार नाहीत," असा दावा राहुल गांधींनी केला आहे.