बेळगाव : ‘भाजप भाषण आणि घोषणाबाजीवर विश्वास ठेवत नाही.तर बोलल्याप्रमाणे करुन दाखवतो. कर्नाटक हा काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे.’ अशी खरमरीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. खानापूर येथे भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.


‘आम्ही शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ केले’

‘उत्तर प्रदेश गरीब प्रदेश आहे. कर्नाटक श्रीमंत प्रदेश आहे. कर्नाटकात पैसा आहे असे म्हणतात. पण कर्नाटकात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये आमचे सरकार सत्तेवर आल्यावर 86 लाख शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव दिला जातो. चाळीस लाख शौचालये उत्तर प्रदेशमध्ये बांधून देण्यात आली आहेत. छत्तीस लाख लोकांना वीज जोडणी करून देण्यात आली आहे.’ असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारची कामगिरी सांगितली.

‘केंद्र सरकार देत असलेला निधी कर्नाटकचे मंत्री हडप करतात’

‘गेल्या पाच वर्षात कर्नाटकातील काँग्रेस सरकारला साडेतीन लाख घरे उभारता आली नाहीत. पण उत्तर प्रदेशात एक वर्षात नऊ लाख घरे बांधली आहेत. कोणताही भेदभाव न करता गरीब, युवक, महिला सगळ्यांना भाजपच्या राज्यात सन्मानाची वागणूक दिली जाते. कर्नाटकचे निधर्मी प्रेम बेगडी आहे. केंद्र सरकार देत असलेला निधी मंत्री हडप करतात. त्यामुळे केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोचत नाहीत.’ असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला.